११ हजारांवर उमेदवार रिंगणात
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: January 8, 2021 04:35 AM2021-01-08T04:35:58+5:302021-01-08T04:35:58+5:30
अमरावती : जिल्ह्यात उमेदवारी अर्ज माघार घेण्याच्या दिवशी सोमवारी उमेदवारांनी अर्ज माघार घेतल्यानंतर चिन्हवाटपाची प्रक्रिया उशिरापर्यंत सुरू आहे. किमान ...
अमरावती : जिल्ह्यात उमेदवारी अर्ज माघार घेण्याच्या दिवशी सोमवारी उमेदवारांनी अर्ज माघार घेतल्यानंतर चिन्हवाटपाची प्रक्रिया उशिरापर्यंत सुरू आहे. किमान ७०० वर उमेदवारांनी अर्ज माघार घेतल्याची शक्यता निवडणूक विभागाने वर्तविली त्यामुळे रिंग्णात ११ हजार ५०० वर उमेदवार रिंगणात आहेत. या सर्व उमेदवारांसाठी १५ जानेवारीला मतदान होणार आहे.
ग्रामपंचायत निवडणुकीसाठी २३ ते ३० डिसेंबर या कालावधीत १२,५९४ उमेदवारी अर्ज दाखल करण्यात आले होते व उमेदवारी अर्ज छाननीच्या दिवशी १३३ अर्ज बाद झाल्याने १२,४६१ अर्ज शिल्लक राहिले. सोमवारी दुपारी ३ पर्यंत उमेदवारी अर्ज माघार घेण्यात आले व लगेच सर्व पात्र उमेदवारांना चिन्हवाटप करण्यात आल्याने आता खऱ्याअर्थाने गावागावांतील निवडणुकीत रंगत येणार आहे.
निवडणूक विभागाने सोमवारी रात्री उशिरा दिलेल्या माहितीनुसार, अमरावती तालुक्यात ४० ग्रामपंचायतींच्या १५४ प्रभागांत १२९ उमेदवारांनी माघार घेतल्याने ९३० उमेदवार रिंगणात आहेत. चांदूर रेल्वे तालुक्यात २९ ग्रामपंचायतीच्या ९३ प्रभागासाठी निवडणूक होत आहे. यामध्ये ५० अर्ज माघार घेतल्याने ५१९ उमेदवार रिंगणात आहे. चांदूरबाजार तालुक्यात ४१ ग्रामपंचायतीच्या १४० प्रभागांसाठी निवडणूक होत आहे. यात ६० अर्जांची माघार घेण्यात आल्याने ८५४ उमेदवार कायम आहेत. वरूड तालुक्यात ४१ ग्रामपंचायतींच्या १३९ प्रभागांत ही निवडणूक होत आहे. यात ७१ उमेदवारांनी माघार घेतली, तर धारणी तालुक्यात ३५ ग्रामपंचायतीत ५१ उमेदवारांनी अर्ज माघार घेतल्याचे निवडणूक विभागाने सांगितले. वृत्त लिहिस्तोवर चिन्ह वाटपाची प्रक्रिया सुरू होती.