विद्यापीठात १११० नवसंशोधकांनी दिली पीएच.डी. कोर्स वर्कची परीक्षा
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: May 3, 2021 04:08 AM2021-05-03T04:08:42+5:302021-05-03T04:08:42+5:30
अमरावती : कोरोना संसर्ग वेगाने वाढत असताना संत गाडगेबाबा अमरावती विद्यापीठाने रविवारी पीएच.डी. कोर्स वर्क मॉड्युल -१ च्या ऑनलाईन ...
अमरावती : कोरोना संसर्ग वेगाने वाढत असताना संत गाडगेबाबा अमरावती विद्यापीठाने रविवारी पीएच.डी. कोर्स वर्क मॉड्युल -१ च्या ऑनलाईन परीक्षेचे यशस्वीपणे आयोजन केले. या ऑनलाईन परीक्षेसाठी कोणत्याही बाह्य यंत्रणेचा वापर न करता विद्यापीठ स्तरावर ऑनलाईन परीक्षा सुरळीतपणे पार पाडण्याची किमया करण्यात आली आहे.
मौखिक चाचणी २६ एप्रिल रोजी आयोजित करण्यात आली होती. मात्र, यात तांत्रिक त्रुटी असल्याने ही मौखिक परीक्षा ३० एप्रिल रोजी दुसऱ्यांदा घेण्यात आली. यात ही परीक्षा १०० टक्के व्यवस्थित पार पडली. परंतु, पीएच.डी. कोर्स वर्क परीक्षा ऑनलाईन घेताना कोणत्याही बाह्य यंत्रणेचा वापर न करता विद्यापीठ स्तरावर ही परीक्षा घेण्यासाठी कुलगुरू मुरलीधर चांदेकर हे आग्रही होते. त्याअनुषंगाने विद्यापीठाच्या पीएच.डी. सेल विभागाने प्रयत्नांची पराकाष्टा केली. परीक्षा विभागाने तज्ज्ञ म्हणून येथील सिपना अभियांत्रिकी व तांत्रिकी महाविद्यालय, राम मेघे अभियांत्रिकी महाविद्यालयांचे सहकार्य घेतले. तसेच मुंबई येथील सौमय्या अभियांत्रिकीची मदत घेण्यात आली. स्वस्तरावर प्रथमच पीएच.डी. कोर्स वर्क परीक्षा यशस्वीपणे पार पाडल्याची नोंद विद्यापीठाने घेतली आहे. प्रथम मॉक टेस्ट यशस्वीपणे झाल्यानंतर २ मे रोजी आयोजित पीएच.डी. कोर्स वर्क परीक्षा ऑनलाईन घेण्याचे निश्चित झाले. अगोदर विद्यापीठाने पीएच.डी. कोर्स वर्क परीक्षा ऑफलाईन घेण्याचे ठरविले होते. मात्र, व्यवस्थापन परिषदेच्या निर्णयानुसार ही परीक्षा ऑनलाईन घेण्यात यावी, असा निर्णय झाला आणि ही परीक्षा सुरळीतपणे आटाेपली. मोबाईल, डेस्कटॉप, लॅपटॉपवरून ९८.८४ टक्के नवसंशाेधकांनी पीएच.डी कोर्स वर्क परीक्षा दिली आहे. ११२३ पैकी १११० परीक्षार्थिंनी ही परीक्षा दिली.
०००००००००००००००००००
अशी झाली विद्या शाखानिहाय परीक्षा
विज्ञान व तंत्रज्ञान : ५४७
आंतरविद्या शाखा : १४४
मानव्यविद्या शाखा : ३३६
विधी शाखा: २२
वाणिज्य शाखा: ६१
--------------------------
कोट
पीएच.डी. कोर्स वर्क मॉड्युल- १ परीक्षा व्यवस्थापन परिषदेच्या निर्णयानुसार रविवारी ऑनलाईन पार पाडली. ११२३ परीक्षार्थ्यांपैकी १११० जणांनी ही परीक्षा दिली. परीक्षेला नवसंशोधकांची ९८.८४ टक्के उपस्थिती होती. कुलगुरू मुरलीधर चांदेकर यांच्या सूचनेनुसार ऑनलाईन परीक्षेसाठी बाह्य यंत्रणेचा वापर न करता विद्यापीठाचे नियोजन केेले.
- हेमंत देशमुख, संचालक, परीक्षा व मू्ल्यांकन मंडळ. विद्यापीठ
--------------------