११२ शिक्षकांवर कारवाईचा दंडुका!
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: November 2, 2018 01:11 AM2018-11-02T01:11:14+5:302018-11-02T01:12:12+5:30
शाळांची गुणवत्ता व विद्यार्थ्यांची पटसंख्या टिकविण्याचे आव्हान न पेलविलेल्या तब्बल ११२ शिक्षकांवर कारवाईची टांगती तलवार आहे. ‘ड’ संवर्गातील अशा शिक्षकांची चढत्या क्रमाने यादी करून संबंधित शिक्षकांवर कठोर कारवाईच्या सूचना आ. सुनील देशमुख यांनी दिल्या.
लोकमत न्यूज नेटवर्क
अमरावती : शाळांची गुणवत्ता व विद्यार्थ्यांची पटसंख्या टिकविण्याचे आव्हान न पेलविलेल्या तब्बल ११२ शिक्षकांवर कारवाईची टांगती तलवार आहे. ‘ड’ संवर्गातील अशा शिक्षकांची चढत्या क्रमाने यादी करून संबंधित शिक्षकांवर कठोर कारवाईच्या सूचना आ. सुनील देशमुख यांनी दिल्या. महापालिकेच्या सभागृहात गुरुवारी त्यांनी विविध विषयांचा आढावा घेतला. बैठकीच्या अध्यक्षस्थानी महापौर संजय नवरणे होते.
पीएम आवास योजनेचा आढावा घेतल्यानंतर देशमुख यांनी महापालिका शाळांमधील पटसंख्या, शिक्षक व गुणवत्तेच्या अंगाने शिक्षणाधिकारी अनिल कोल्हे यांची झाडाझडती घेतली. विद्यार्थ्यांची गुणवत्ता व पटसंख्या प्रमाण मानून महापालिकेतील एकूण ३६९ शिक्षकांची अ, ब, क व ड अशी वर्गवारी करण्यात आली. ज्या शाळांमधील विद्यार्थ्यांची गुणवत्ता व पटसंख्या माघारली, ते शिक्षक ड वर्गात ठेवण्यात आले. त्यात प्रथम भाषा शिकविणारे ७९ व गणिताचे ३३ शिक्षक 'ड' यादीत आले. त्यांना कारणे 'शोकॉज' बजावल्याची माहिती कोल्हे यांनी दिली. त्यावर ते कारणे दाखवा नोटीस वा तंबीला जुमानणारे नसून त्यांच्यावर बडतर्फी किंवा निलंबनाची कारवाई प्रस्तावित करण्याची सूचना देशमुख यांनी केली.
जिल्हा परिषदेतून महापालिकेत आलेल्या ६८ शिक्षकांपैकी बहुतांश शिक्षकांनी पहिला वर्ग व सामाजिक शास्त्र असे दोन विषयच स्वत: शिकविण्यासाठी निवडल्याची बाब बैठकीदरम्यान उघड झाली. त्यांनी केलेल्या हुशारीची तपासणी करण्याच्या सूचना त्यांनी केल्या. जे शिक्षक अतिरिक्त आहेत, त्यांची यादी करून त्यांना परत पाठविण्याची कार्यवाही करण्याचे निर्देश आ. देशमुख यांनी दिले. बैठकीला माजी महापौर मिलिंद चिमोटे व विलास इंगोले, उपमहापौर संध्या टिकले, सभागृहनेता सुनील काळे, विरोधीपक्षनेता बबलू शेखावत, गटनेता प्रशांत वकानखडे, चेतन पवार, दिनेश बूब, शिक्षण सभापती पद्मजा कौंडण्य, उपसभापती प्रणित सोनी, प्रभारी उपायुक्तद्वये नरेंद्र वानखडे व महेश देशमुख उपस्थित होते.
पीएम आवास योजनेला गती द्या
महापालिका क्षेत्रात राबविल्या जाणाऱ्या पीएम आवास योजनेच्या अंमलबजावणीस गती देण्याचे निर्देश आ. देशमुख यांनी दिले. योजनेअंतर्गत आतापर्यंत ११२ घरे पूर्ण झाली असून, ६५१ लाभार्थ्यांना कार्यारंभ आदेश देण्यात आले. ८३ लाभार्थी घरात राहावयास गेले. १४०५ लाभार्थ्यांचे नकाशे मंजूर करण्यात आल्याची माहिती बैठकीदरम्यान देण्यात आली.
हॉकर्सचा प्रश्न जटील
शहरात नव्याने बनलेल्या सिमेंट रोडवर हॉकर्सचे जाळे निर्माण झाले आहे. महाराष्टÑाबाहेरचे लोक अमरावतीत येऊन आणि हातगाड्या भाड्याने देऊन पैसे कमावण्याचा गोरखधंदा करीत आहेत. एवढेच काय तर अनेक रस्त्यांवरील फेरिीवाल्यांकङून हप्तेवसुली करण्यात येत असल्याची धककादायक बाब नगरसेवक प्रणित सोनी यांनी बैठकीदरबम्यान निदर्शनास आणून दिली. तेव्हा अवैध फेरीवाल्यांचे वाढते अतिक्रमण वेळीच रोखण्याचे निर्देश आ. देशमुख यांनी दिले.