अस्मानी, सुल्तानी संकटाचे ११४० बळी; दर आठ तासात एक शेतकरी आत्महत्या
By गजानन उत्तमराव मोहोड | Published: January 9, 2024 07:29 PM2024-01-09T19:29:59+5:302024-01-09T19:30:05+5:30
पश्चिम विदर्भात शेतकरी आत्महत्यांचे सत्र
अमरावती : महाराष्ट्र शेतकरी आत्महत्यामुक्त करू, अशी घोषणा मुख्यमंत्र्यांनी सत्ता स्थापनेच्या पहिल्याच दिवशी केली होती. मात्र, शेतकरी आत्महत्यांचे सत्र थांबलेले नाही. पश्चिम विदर्भात २०२३ मध्ये म्हणजेच ३६५ दिवसांत तब्बल ११४० शेतकऱ्यांनी मृत्यूला कवटाळले आहे. राज्यात सर्वाधिक शेतकरी आत्महत्या पश्चिम विदर्भात झाल्या आहेत. हे सर्व शेतकरी अस्मानी अन् सुलतानी संकटाचे बळी ठरले आहेत.
पश्चिम विदर्भात दर दिवशी तीन म्हणजेच दर आठ तासांत एक शेतकरी मृत्यूचा घोट घेत असल्याचे विदारक चित्र आहे. याची कारणे शोधण्यासाठी तत्कालीन कृषिमंत्री अब्दुल सत्तार मुख्यमंत्र्यांच्या सूचनेनुसार एक दिवस अमरावती जिल्ह्यात मेळघाटातील आदिवासीबहुल शेतकऱ्याच्या घरी एक दिवस मुक्कामी राहिलेत. त्यानंतर त्यांनी शेतकरी आत्महत्याप्रवण १४ जिल्ह्यांतील जिल्हाधिकारी व अन्य अधिकाऱ्यांना ‘एक दिवस बळीराजासाठी’ हा कार्यक्रम दिला व शेतकरी आत्महत्या होण्यामागची कारणे व अहवाल मागितला. शासनाचा उद्देश चांगला असला तरी अभियान मात्र फोटोसेशनपुरते मर्यादित राहिले.
पश्चिम विदर्भात गेल्या वर्षभरात ११४० शेतकरी आत्महत्या झालेल्या आहेत. यामध्ये शासन मदतीसाठी ५१७ प्रकरणे पात्र ठरली. याशिवाय ३१७ प्रकरणे शासन मदतीसाठी अपात्र ठरविण्यात आलेली आहेत, तर ११ महिन्यांपासून तब्बल २३५ प्रकरणे चौकशीसाठी प्रलंबित असल्याने शासन-प्रशासन याविषयी गंभीर नसल्याचा आरोप होत आहे.
सन २००१ पासूनची स्थिती
आतापर्यंत शेतकरी आत्महत्या : २०,००६
शासन मदतीसाठी पात्र प्रकरणे : ९,३७३
आतापर्यंत अपात्र प्रकरणे : १०,३९८
चौकशीसाठी अद्याप प्रलंबित : २३५
शेतकरी आत्महत्यांची प्रथमदर्शनी कारणे
१) विभागीय आयुक्त कार्यालयाच्या माहितीनुसार पश्चिम विदर्भात जानेवारी महिन्यात १०३, फेब्रुवारी ७३, मार्च १०३, एप्रिल ८६, मे १०६, जून ९६, जुलै ८६, ऑगस्ट १०१, सप्टेंबर १०७, ऑक्टोबर १०४, नोव्हेंबर ८७, डिसेंबरमध्ये ८८
२) शेतकरी आत्महत्या होण्यामागे नैसर्गिक आपत्ती, दुष्काळ, नापिकी, बँकांचे व खासगी सावकारांचे कर्ज, कर्ज वसुलीसाठी तगादा, मुलीचे लग्न, आजारपण व यासह इतर बाबींमुळे येणारा मानसिक तणाव कारणीभूत आहे.