११६ शाळांच्या पोषण आहाराची तपासणी
By admin | Published: December 5, 2015 12:19 AM2015-12-05T00:19:53+5:302015-12-05T00:19:53+5:30
तालुक्यातील शालेय विद्यार्थ्यांना चविष्ट आहार मिळावा, यासाठी ११६ शाळांतील पोषण आहाराची तपासणी करण्याकरिता पंचायत समितीने पुढाकार घेतला आहे़ ...
कारवाईचे प्रावधान : पंचायत समितीचा पुढाकार
धामणगाव रेल्वे : तालुक्यातील शालेय विद्यार्थ्यांना चविष्ट आहार मिळावा, यासाठी ११६ शाळांतील पोषण आहाराची तपासणी करण्याकरिता पंचायत समितीने पुढाकार घेतला आहे़ तपासणीदरम्यान पोषण आहारात निकृष्ट दर्जा आढळून आल्यास संबंधित अधिकाऱ्यांवर कारवाई करण्यात येणार आहे.
धामणगाव तालुक्यात जिल्हा परिषदेअंतर्गत ८४ तर खासगी, माध्यमिक अशा ११६ शाळांतून इयत्ता पहिली ते आठवीपर्यंतच्या विद्यार्थ्यांना पोषण आहार देण्यात येते़ सहा दिवस कशा प्रकारचा पोषण आहार द्यावा यासंदर्भात प्रत्येक शाळेत प्रशासनाने माहिती पुरविली आहे. मात्र अनेक शाळांत बेचव पोषण आहार देण्यात येत असल्याची माहिती पंचायत समितीला प्राप्त होताच या शाळांची पोषण आहार तपासणी करण्याचा निर्णय पंचायत समिती पदाधिकाऱ्यांनी घेतला आहे़
प्रत्येक विद्यार्थ्याला उत्कृष्ट पोषण आहार मिळावा, याकरिता सर्व शिक्षकांनी लक्ष द्यावेत, अशा सूचना पंचायत समितीचे सभापती गणेश राजनकर, उपसभापती अतुल देशमुख यांनी दिल्या आहेत़
ज्या शाळेत विद्यार्थ्यांना योग्य पध्दतीने पोषण आहार देण्यात येणार नाही असे चौकशीदरम्यान आढळले तर अशा शाळांवर कारवाई करण्याचा प्रस्ताव तयार करण्यात येणार असल्याची माहिती गटशिक्षणाधिकारी सुनंदा बंड यांनी दिली़ याची अंमलबजावणी केली जात असल्याने पोषण आहार वाटपासंबंधीत अधिकाऱ्यांना धडकी भरली आहे. यावर शासनाचा अंमल राहणार आहे. (तालुका प्रतिनिधी)