११७ निवडणूक अधिकारी, कर्मचाऱ्यांसह १७ उमेदवारही पॉझिटिव्ह
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: January 10, 2021 04:11 AM2021-01-10T04:11:15+5:302021-01-10T04:11:15+5:30
अमरावती : ग्रामपंचायत निवडणूक प्रक्रियेतील अधिकारी, कर्मचारी व उमेदवारांना कोरोना चाचणी बंधनकारक करण्यात आलेली आहे. या कालावधीत जिल्ह्यात एकूण ...
अमरावती : ग्रामपंचायत निवडणूक प्रक्रियेतील अधिकारी, कर्मचारी व उमेदवारांना कोरोना चाचणी बंधनकारक करण्यात आलेली आहे. या कालावधीत जिल्ह्यात एकूण १२,५४६ आरटी-पीसीआर चाचण्या करण्यात आल्या. यात ११७ अधिकारी, कर्मचारी, तर १७ उमेदवार पॉझिटिव्ह आले आहेत. यातील सर्वाधिक ४२ जण धारणी तालुक्यातील असल्याचे जिल्हा निवडणूक विभागाने सांगितले.
कोरोना संसर्गाच्या पार्श्वभूमीवर सध्या प्रत्येक पातळीवर कोरोना प्रतिबंधक उपाययोजना केल्या जात आहेत. त्याच अनुषंगाने प्रक्रियेतील सर्व अधिकारी, कर्मचारी व उमेदवार व त्यांच्या प्रतिनिधींना कोरोना चाचणी बंधनकारक आहे. यासाठी जिल्हाधिकारी कायार्लयासह सर्व तालुक्यांच्या मुख्यालयी नमुने संकलनाची सुविधा देण्यात आलेली आहे. तसेही जिल्ह्यातील सर्वच केंद्रांवर कुणालाही आरटी-पीसीआर चाचणी करता येत असल्याचे जिल्हा प्रशासनाने सांगितले.
निवडणूक विभागाद्वारा उमेदवारी अर्जासोबत कोरोना चाचणी अहवालही मागण्यात आलेला होता. त्या अनुषंगाने उमेदवारांनी चाचण्या केल्या आहेत. याशिवाय उमेदवार प्रतिनिधी व मतदान प्रतिनिधी यांनाही कोरोना चाचणी बंधनकारक करण्यात आलेली आहे. याशिवाय प्रक्रियेतील १९ हजारांवर कर्मचाऱ्यांनाही कोरोना चाचणी करावी लागणार आहे. मतदान व मतमोजणी प्रक्रियेदरम्यान कोरोना प्रतिबंधात्मक उपायोजनांची अंमलबजावणी करण्यात येणार आहे. याबाबतच्या गाईडलाईन आयोगाने दिल्या आहेत.
पाईंटर
निवडणुकीसाठी लागणारे मनुष्यबळ : १९,४१६
निवडणूक होऊ घातलेल्या ग्रामपंचायती : ५३८
रिंगणात उमेदवार : १०,५५३
झालेल्या चाचण्या : १२,५४५
एकूण पॉझिटिव्ह : १३४
बॉक्स
३७० आरओ, एआरओ
जिल्ह्यात ५३८ ग्रामपंचायतींच्या निवडणुकीत ३७० निवडणूक निर्णय अधिकारी व सहा निवडणूक निर्णय अधिकारी यांची नियुक्ती करण्यात आलेली आहे. याशिवाय २२१४ मतदान केंद्रांवर मतदान केंद्राध्यक्ष व प्रत्येकी ३ मतदान अधिकारी असे एकूण १८९९० अधिकारी व कर्मचारी राहतील. या सर्व कर्मचाऱ्यांची नियुक्ती तालुकास्तरावर करण्यात आलेली आहे. याशिवाय ५६ झोनल अधिकारी असे एकूण १९, ४१६ मनुष्यबळाची आवश्यकता राहणार आहे.
बॉक्स
कोरोनाच्या पार्श्वभूमीवर घेतली जातेय काळजी
मतदान केंद्राची जागा व साहित्य मतदानाच्या एक दिवस आधी सॅनिटाईझ करावे, प्रत्येक मतदान केंद्राच्या प्रवेशाच्या ठिकाणी थर्मल स्क्रिनिंग करावे, मतदान केंद्राच्या प्रवेशद्वारावर मतदान कर्मचारी किंवा पॅरावैद्यकीय कर्मचारी किंवा आशा कर्मचारी यांच्याद्वारे मतदारांच्या तापमानाची तपासणी करावी आदी निर्देश आयोगाने दिले आहेत. मतदारांचे तापमान अधिक असेल तर त्या मतदाराला टोकन दिले जावून मतदान संपण्याच्या अर्धा तास अगोदर मतदान करता येईल व यासाठी विलगीकरण कक्षही असेल.