११८ वर्षांनंतर ‘ग्लँडर्स’चा संसर्ग
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: August 5, 2017 11:18 PM2017-08-05T23:18:06+5:302017-08-05T23:19:01+5:30
भारतात तब्बल ११८ वर्षांनंतर ‘ग्लँडर्स’या प्राणघातक व असाध्य आजाराचा संसर्ग झाल्याची बाब उघड झाली आहे.
लोकमत न्यूज नेटवर्क
अमरावती : भारतात तब्बल ११८ वर्षांनंतर ‘ग्लँडर्स’या प्राणघातक व असाध्य आजाराचा संसर्ग झाल्याची बाब उघड झाली आहे. दर्यापूर तालुक्यातील अडुळा बाजार येथील एका घोड्याला ‘ग्लँडर्स’चा संसर्ग झाल्याचे निष्पन्न झाल्यानंतर त्याला ३० जुलैला वेदनारहित मृत्यू देण्यात आला. त्याअनुषंगाने ‘ग्लँडर्स’चा संसर्गाची भयानकता अधोरेखित झाली आहे. महाराष्ट्र शासनाने ग्लँडर्स या आजाराला अधिसूचित रोग असल्याचे घोषित केले आहे. याशिवाय राज्यातील अहमदनगर, ठाणे व अकोला या जिल्ह्याला नियंत्रित क्षेत्र म्हणून घोषित केले आहे. अडळुबाजार येथील बाधित घोड्याला वेदनारहित मृत्यू दिल्यानंतर अमरावती जिल्ह्याचाही नियंत्रित क्षेत्र म्हणून समावेश होण्याची शक्यता आहे.
नजीकच्या जिल्ह्यात तपासणी मोहीम
अमरावती : घोडा, गाढव आणि खेचर या अश्ववर्गीय प्राण्यांमध्ये आढळून आलेला ग्लँडर्स हा मानवासाठीही घातक असल्याचे पशुवैद्यक शास्त्रातील तज्ज्ञांनी स्पष्ट केले आहे. या आजाराची बाधा अन्य अश्ववर्गीय प्राण्यांना तथा मानवाला होऊ नये, यासाठी उपाययोजना आखल्या आहेत. या आजारावर कुठलीही लस व औषधी उपलब्ध नसल्याने हा रोग असाध्य असल्याने अश्ववर्गीय प्राण्यांची तपासणी हाती घेण्यात आली आहे. दर्यापूर तालुक्यातील अडुळाबाजारापूर्वी राज्यातील अहमदनगर, ठाणे व अकोला या जिल्ह्यातील घोड्याना ग्लँडर्सची बाधा झाल्याच्या घटना उघड झाल्या. अकोल्यातील मूर्तिजापूर तालुक्यातील घोड्यांना ग्लँडर्सचा संसर्ग झाल्याचे उघड झाल्यानंतर नजीकच्या जिल्ह्यात तपासणी मोहीम राबविण्यात आली. त्या अनुषंगाने जिल्ह्यातील ८२ घोड्यांचे रक्तजल नमुने तपासणीसाठी पाठविण्यात आले. त्यातील अडुळाबाजार येथील एक घोडा ग्लँडर्सबाधीत आढळून आला. त्या घोड्याच्या मालकासह गावकºयांना विश्वासात घेऊन पशुसंवर्धन विभागाने संसर्गबाधीत घोड्याला वेदनरहीन मरण दिले. त्या पार्श्वभुमिवर अडळुबाजाराच्या ० ते ५ किलोमिटर परिघातील घोड्यांची तपासणी करून त्यांचे रक्तजल नमुने गोळा करण्याचे आदेश देण्यात आले आहेत.
पशुवैद्यक क्षेत्रातील तज्ज्ञ व पशुसंवर्धन विभागातील अधिकाºयांच्या माहितीनुसार अमरावती जिल्ह्यात १८९९ नंतर पहिल्यांदाच एखाद्या घोड्याला ग्लँडर्सची बाधा झाल्याचा प्रकार उघड झाला आहे.
'त्या' घोड्याला १०४ 'फॅरानहीट फिवर'
अडुळाबाजारातील ग्लँडर्सबाधित घोड्याला वेदनारहित मृत्यू देण्यात आला. त्याला १०४ फॅरानहीट फिवर (ताप) होता. सहसा घोडा बसत नाही. मात्र, हा घोडा बसल्याचे निरीक्षणही पशुसंवर्धन विभागाने नोंदविले. त्याच्या अंगावर गाठीही आल्या होत्या. श्वसनसंस्थेशी निगडित लक्षणेही त्याच्यात आढळून आलीत. त्यामुळे त्याला मृत्यू देऊन त्याचे पार्थिव खोल खड्ड्यात पुरण्यात आले. त्यात चुना अंथरून कुठलाही प्राणी घोड्याचे शव उखरणार नाही, याची तजवीज करण्यात आली आहे.