११वी प्रवेशाकरिता साडेचार हजार अर्ज दाखल
By admin | Published: July 1, 2014 11:13 PM2014-07-01T23:13:17+5:302014-07-01T23:13:17+5:30
इयत्ता ११ वीच्या केंद्रीय प्रवेश पध्दतीत अर्ज स्वीकारणे सुरु असून पहिल्या दिवशी अर्ज दाखल करण्यासाठी विद्यार्थ्यांनी गर्दी केली होती. मात्र दुसऱ्या दिवशी मंगळवारी विद्यार्थ्यांची गर्दी ओसरली होती.
अमरावती : इयत्ता ११ वीच्या केंद्रीय प्रवेश पध्दतीत अर्ज स्वीकारणे सुरु असून पहिल्या दिवशी अर्ज दाखल करण्यासाठी विद्यार्थ्यांनी गर्दी केली होती. मात्र दुसऱ्या दिवशी मंगळवारी विद्यार्थ्यांची गर्दी ओसरली होती. १४ केंद्रावर आतापर्यंत ४ हजार ८६८ अर्ज प्राप्त झाले आहेत.
शहरात सुमारे ५० महाविद्यालये असून त्यामध्ये कला, वाणिज्य, विज्ञान व व्यावसायिक अभ्यासक्रमाच्या शाखानिहाय ९ हजार ३५५ विद्यार्थ्यांची प्रवेश क्षमता आहे. २७ जूनपासून शाळा व कनिष्ठ महाविद्यालय स्तरावर अकरावी प्रवेश प्रक्रियेच्या अर्ज वितरणाला सुरवात करण्यात आली होती. शहरातील १४ महाविद्यालयामध्ये अर्ज वितरणाची प्रक्रिया राबविल्या गेली. यामध्ये आतापर्यंत ७ हजार ५०० अर्जाची विक्री विविध महाविद्यालयांतर्गत झाली आहे.
महाविद्यालयातील गर्दी ओसरली
१ जुलैपासुन अर्ज स्विकृतीला सुरुवात होताच पहील्याच दिवशी शहरातील विविध महाविद्यालयातमध्ये विद्यार्थ्यांनी अर्ज देण्याकरीता प्रचंड गर्दी केली होती. पहिल्याच दिवशी २ हजार ८१५ अर्ज तर दुसऱ्या दिवशी मंगळवारी २ हजार ५३ अर्ज विविध महाविद्यालयात स्वीकृत करण्यात आले.मात्र दुसऱ्या दिवशी शहरातील महाविद्यालयामध्ये फारशी गर्दी दिसून आली नाही.शहरातील १४ सगणकीय केन्द्रावर अर्ज स्विकृती सुरु असुन ४ जुलैपर्यंत अर्ज स्विकारले जातील.
विज्ञान व वाणिज्य शाखेकडे कल
अकरावी प्रवेशकरीता शहरातील विविध महाविद्यालयात अर्ज भरण्याकरीता विद्यार्थ्यांची गर्दी पाहायला मिळाली. यावर्षी अर्ज स्विकृतीदरम्यान काही विद्यार्थ्यांशी सवांद साधला असता विज्ञान व वाणिज्य शाखेत प्रवेशाकरिता विद्यार्थ्यांचा अधिक कल आहे.