१५७ महाविद्यालयांकडून १२ कोटींची रक्कम वसूल; उच्च शिक्षण विभागाची मोठी कारवाई

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: January 10, 2020 06:56 PM2020-01-10T18:56:01+5:302020-01-10T18:58:42+5:30

प्राध्यापकांच्या नियमबाह्य वाढीव वेतनवाढीला लगाम

12 crore recovered from 157 colleges; Great action from the higher education department | १५७ महाविद्यालयांकडून १२ कोटींची रक्कम वसूल; उच्च शिक्षण विभागाची मोठी कारवाई

१५७ महाविद्यालयांकडून १२ कोटींची रक्कम वसूल; उच्च शिक्षण विभागाची मोठी कारवाई

Next

अमरावती : केंद्रीय अनुदान आयोगाच्या नियमावलीनुसार वरिष्ठ महाविद्यालयीन प्राध्यापकांना २ जानेवारी ते ३० जून या दरम्यान करियर अ‍ॅडव्हान्स स्कीम अंतर्गत वाढीव वेतनवाढ दिले जाते. मात्र, काही प्राध्यापकांनी चिरीमिरी करून १ जुलैनंतरही नियमबाह्य वेतनवाढ घेऊन रकमेची उचल केल्याची बाब निदर्शनास आली आहे. संत गाडगेबाबा अमरावती विद्यापीठांतर्गत १५७ महाविद्यालयांच्या प्राध्यापकांकडून अशाप्रकारे अतिरिक्त १२ कोटी रुपये वसूल करण्यात आले आहे. उच्च शिक्षण विभागाच्या या धाडसी कारवाईमुळे प्राध्यापकांमध्ये एकच खळबळ उडाली आहे.

१ जुलैनंतर वेतनवाढ देण्याची नियमावली नाही. असे असताना उच्च शिक्षण सहसंचालक कार्यालयातील संबंधितांना हाताशी धरून १ जुलैनंतरही वेतनवाढ घेण्याचा प्रताप प्राध्यापकांनी केला होता. ही बाब तपासणीदरम्यान उच्च शिक्षण सहसंचालकांच्या निदर्शनास आली. यानंतर २ जानेवारी ते ३० जून या कालावधीनंतर वेतनवाढ घेणाºया प्राध्यापकांची चाचपणी करण्यात आली. १५७ महाविद्यालयांतील प्राध्यापकांना वेतनवाढीची रक्कम परत करण्याचे आदेश बजावण्यात आले. या कारवाईविरोधात पुढाऱ्यांच्या संस्थांकडून उच्च शिक्षण सहसंचालकांवर राजकीय दबावतंत्र वापरण्यात आले.

मात्र, जे नियमात आहे तेच होईल, असा पवित्रा उच्च शिक्षण विभागाच्या अमरावती सहसंचालकांनी घेतला. परिणामी १४ जानेवारी २०१८ ते १५ डिसेंबर २०१९ या कालावधीत प्राध्यापकांकडून १२ कोटींहून अधिक रक्कम वसूल करून शासनतिजोरीत जमा करण्यात आली आहे.

‘अमरावती पॅटर्न’ राज्यभर राबविला

आर्थिक वसुलीचा ‘अमरावती पॅटर्न’ आता राज्यभर राबविला जात आहे. १ जुलैनंतर करियर अ‍ॅडव्हान्स स्किम अंतर्गत वाढीव वेतनवाढ घेणाऱ्या प्राध्यापकांचा शोध घेण्याचे आदेश उच्च शिक्षण विभागाने काढले आहेत. अमरावती येथील उच्च शिक्षण सहसंचालकांच्या धाडसी कारवाईमुळे महाविद्यालये व प्राध्यापक यांच्यात धडकी भरली आहे. 

प्राध्यापकांची नियमबाह्य वेतनवाढ रोखण्याचा निर्णय हा यूजीसीच्या नियमानुसार घेतला आहे. आतापर्यंत १२ कोटींपेक्षा अधिक रक्कम वसूल करण्यात आली आहे. यात वाढ होण्याची शक्यता आहे.
  - केशव तुपे, सहसंचालक, उच्च व शिक्षण अमरावती

Web Title: 12 crore recovered from 157 colleges; Great action from the higher education department

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.