कृषिपंपांसाठी मिळणार १२ तास ‘थ्री फेज’ वीजपुरवठा
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: September 9, 2017 07:30 PM2017-09-09T19:30:19+5:302017-09-09T20:45:47+5:30
राज्यात कमी पर्जन्यमान असलेल्या तालुक्यांमध्ये कृषिपंपांसाठी १२ तासांचा ‘थ्री-फेज’ वीजपुरवठा देण्यात येईल. शासनाने गुरूवारी हा निर्णय घेतला आहे.
अमरावती, दि. 9 - राज्यात कमी पर्जन्यमान असलेल्या तालुक्यांमध्ये कृषिपंपांसाठी १२ तासांचा ‘थ्री-फेज’ वीजपुरवठा देण्यात येईल. शासनाने गुरूवारी हा निर्णय घेतला आहे.
पुरेशा पावसाअभावी उभ्या पिकांचे नुकसान होऊ नये म्हणून कृषिपंपांसाठी अतिरिक्त वीजपुरवठा देण्यास शासन विचाराधीन होते. राज्यातील प्रत्येक जिल्ह्यात जिल्हा पातळीवर पालकमंत्र्यांच्या अध्यक्षेखाली एक समिती गठित करण्याचा निर्णय शासनाने घेतला आहे. या समितीमध्ये जिल्हाधिकारी, जिल्हा कृषी अधिकारी, भूजल सर्वेक्षण अणि विकास यंत्रणेचे वैज्ञानिक व महावितरण कंपनीचे संबंधित अधीक्षक अभियंत्यांचा समावेश करण्याच्या सूचनाही देण्यात आल्या आहेत. प्रत्येक जिल्ह्यात अशी एक समिती गठित करण्याचे रीतसर आदेश संबंधित जिल्हाधिकारी कार्यालयामार्फत काढण्यात येणार आहेत.
राज्यात यंदाच्या पावसाळ्यात काही जिल्ह्यांमध्ये पावसाचे प्रमाण सरासरीपेक्षा अधिक आहे, तर काही जिल्ह्यांमध्ये अद्याप पुरेसा पाऊस पडला नाही. पावसाअभावी उगवलेली पिके करपण्याची शक्यता निर्माण झाली आहे. पुरेशा पावसाअभावी शेतातील उभी पिके नष्ट झाल्यास राज्यात अभुतपूर्व धान्य व चाराटंचाई निर्माण होण्याची शक्यता नाकारता येत नाही. एकूण टंचाईची नुकसान भरपाई व अतिरिक्त वीजपुरवठ्याकरिता महावितरण कंपनीला द्यावयाचे अनुदान याची तुलना केल्यास सदर अनुदानापेक्षा अधिकपटीने टंचाईवर खर्च करावा लागेल. त्याकरिता ज्या जिल्ह्यांमध्ये अशी परिस्थिती उदभवणार आहे त्या ठिकाणी कृषीपंपाकरिता नेहमीच्या ८ ते १० तासांऐवजी १२ तास थ्री फेज वीजपुरवठा करण्यासाठी जिल्हापातळीवर पालकंमत्र्यांच्या अध्यक्षतेखाली एक समिती गठित करण्यात येणार आहे.