12 सदस्यीय समिती ठरवणार योग शिक्षणाचे धोरण, शशिकला वंजारींकडे अध्यक्षपद
By ऑनलाइन लोकमत | Published: September 8, 2017 05:40 PM2017-09-08T17:40:40+5:302017-09-08T17:41:02+5:30
योग शिक्षणाचा विविध अभ्यासक्रमांमध्ये समावेश करण्यासह त्यासाठीचे धोरण ठरविण्यासाठी एसएनडीटी महिला विद्यापीठाच्या कुलगुरु शशिकला वंजारी यांच्या अध्यक्षतेत १२ सदस्यीय समिती गठित करण्यात आली आहे.
अमरावती, दि. 8 - योग शिक्षणाचा विविध अभ्यासक्रमांमध्ये समावेश करण्यासह त्यासाठीचे धोरण ठरविण्यासाठी एसएनडीटी महिला विद्यापीठाच्या कुलगुरु शशिकला वंजारी यांच्या अध्यक्षतेत १२ सदस्यीय समिती गठित करण्यात आली आहे.
पंतप्रधानांच्या पुढाकाराने संयुक्त राष्ट्राद्वारे २१ जून हा दिवस आंतरराष्ट्रीय योगदिवस म्हणून साजरा करण्यात येतो. योगाचे दैनंदिन जीवनात आचरण केल्याने होणारे फायदे विचारात घेता तसेच योगाचे महत्त्व लक्षात घेऊन योगशास्त्राचा प्रचार आणि प्रसार होण्यासाठी योगशिक्षणासाठी विविध उपक्रम राज्य शासनाने हाती घेतले आहेत. योगशास्त्राचा प्रचार करण्यासाठी योगशिक्षकांची नेमणूक व योगशिक्षणाचा विविध अभ्यासक्रमांमध्ये समावेश व त्याद्वारे याक्षेत्रात काम करणा-या विविध संस्था, व्यक्ती यांच्याशी विचारविनिमय करून योगशिक्षणाचे एक धोरण तयार करण्याची बाब राज्य शासनाच्या विचाराधीन होती.
त्याअनुषंगाने योगशिक्षणाचे धोरण तयार करण्यासाठी अनुभवी व तज्ज्ञ व्यक्तींचा समावेश असलेली १२ सदस्यीय समिती गठित करण्यात आली आहे. यात शशिकला वंजारी अध्यक्ष तर श्रीराम सावरीकर, विवेकानंद केंद्राचे अभय बापट, पुण्याच्या पल्लवी कव्हाणे, नागपुरच्या जनार्दन स्वामी, योगाभ्यासी मंडळाचे सुनील सिरसीकर, समर्थ व्यायाम शाळा दादरचे उदय देशपांडे, कैवल्यधाम लोणावळ्याचे सुबोध तिवारी, जनार्दनस्वामी मंडळाचे राम खांडवे, खडकी कॉलेजचे विनायक तिजारे, बृहन्महाराष्ट्र योग परिषदेचे सरकार्यवाहक अरुण खोडस्कर, साताºयाचे बसवराज देशमुख हे सदस्य तर उच्चशिक्षण संचालक पुणे हे समन्वयक म्हणून काम पाहतील. या समितीचा अहवाल प्राप्त झाल्यानंतर योगधोरणावर शिक्कामोर्तब होईल.