अमरावतीत जात वैधता प्रमाणपत्रासाठी १२ महिन्यांची मुदत
By ऑनलाइन लोकमत | Published: April 1, 2023 05:12 PM2023-04-01T17:12:31+5:302023-04-01T17:12:48+5:30
चिखलदरा व्यतिरिक्त उर्वरित सर्व तालुक्यात कृषी उत्पन्न बाजार समितीची निवडणुकीची प्रक्रिया सध्या सुरू आहेत.
अमरावती : बाजार समिती निवडणुकीत राखीव प्रवर्गात चार संचालक पदे आहेत. या प्रवर्गात निवडणूक लढविणाऱ्या उमेदवारांना आता जात वैधता प्रमाणपत्र सादर करण्यासाठी १२ महिन्यांची मुदत देण्यात आलेली आहे. मात्र, या उमेेदवारांना अर्जासोबत हमीपत्र जोडावे लागेल. तसे आदेश प्राधिकरणाने ३० मार्चला दिले आहेत.
चिखलदरा व्यतिरिक्त उर्वरित सर्व तालुक्यात कृषी उत्पन्न बाजार समितीची निवडणुकीची प्रक्रिया सध्या सुरू आहेत. यामध्ये कृषी पतसंस्था सदस्य, बहुउद्देशीय सहकारी संस्था सदस्य व ग्रामपंचायत सदस्य या मतदार संघातून शेतकरी उमेदवारांना निवडणूक लढविणार आहेत. यामध्ये सोसायटी मतदारसंघात ११ संचालक आहेत व यामध्ये इतर मागास प्रवर्गात १, व विमुक्त जाती व भटक्या जमाती प्रवर्गाकरिता १, याशिवाय ग्रामपंचायत मतदारसंघात अनु. जाती व जमाती प्रवर्गातून १ संचालक निवडून जाणार आहे.
या राखीव प्रवर्गातील उमेदवारांना अर्जासोबत जात वैधता प्रमाणपत्र सादर करणे अनिवार्य आहे, मात्र अनेक उमेदवारांचे प्रस्ताव जात वैधता समितीकडे सादर केले आहेत व प्रमाणपत्र मिळण्यास किमान सहा महिने लागणार आहे. त्यामुळे निवडून आल्याचे १२ महिन्याच्या आत प्रमाणपत्र सादर करणार असल्याबाबतचे हमीपत्र उमेदवारी अर्जासोबत द्यावे लागेल. प्राधिकरणाचे या निर्णयामुळे या प्रवर्गातील उमेदवारांना दिलासा मिळाला आहे.