अन दुपारी १२ च्या ठोक्याला शहर पोलीस ॲक्शन मोडवर
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: May 10, 2021 04:13 AM2021-05-10T04:13:01+5:302021-05-10T04:13:01+5:30
अमरावती : कडक लॉकडाऊनच्या पार्श्वभूमीवर रविवारी दुपारी १२ च्या ठोेक्याला शहर पोलीस ॲक्शन मोडवर आली. ४५ फिक्स पॉईंट व ...
अमरावती : कडक लॉकडाऊनच्या पार्श्वभूमीवर रविवारी दुपारी १२ च्या ठोेक्याला शहर पोलीस ॲक्शन मोडवर आली. ४५ फिक्स पॉईंट व सात नाकाबंदी पॉइंट अशा ५२ ठिकाणी पोलिसांचा कडक बंदोबस्त लागला होता. त्या ठिकाणाहून ये-जा करणाऱ्यांना रोखण्यात आले. समाधानकारक उत्तर न मिळाल्याने अनेकांना दंडुक्याचा प्रसाद खावा लागला. काही जणांवर थेट गुन्हा नोंदविण्यात आला.
रविवारपासून १५ मे पर्यंत कडक लॉकडाऊन जारी करण्यात आला आहे. मात्र, सकाळी १२ वाजेपर्यंत नागरिकांनी पुन्हा घराबाहेर पडून भाजीपाला व इतर जीवनावश्यक वस्तू खरेदी केल्या. मात्र, दुपारी १२ वाजताच पोलीस अर्लट झाले. चौकाचौकांत विनाकरण फिरणाऱ्यांना अडविण्यात आले. त्यांना जाब विचारण्यात आला. मेडिकल सेवा व्यतिरिक्त फिरणाऱ्यांवर कारवाई करण्यात आली. शहरात १,५०० पेक्षा अधिक पोलीस तैनात करण्यात आले होते. पोलीस आयुक्त आरती सिंह यांनी दुपारी १२ वाजतानंतर फिक्स पॉइंटला भेटी देऊन आढावा घेतला. कडक कारवाईचे निर्देशही दिले. त्यांनी जयस्तंभ चौक, पंचवटी चौक व इतर चौकांत पाहणी केली. इर्विन चौक व इतर चौकांतील पेट्रोपपंपाची पाहणी करून फक्त अत्यावश्यक सेवेतील शासकीय कर्मचाऱ्यांना पेट्रोल देण्याच्या सूचना केल्या. इतर नागरिकांना पेट्रोलची विक्री करू नये, अन्यथा कारवाई केली जाईल, असे पेट्रोलपंप संचालकाला बजावले. तसेच काही पेट्रोल पंपावर होमगार्ड व पोलीससुद्धा तैनात करण्यात आले होते. गाडगेनगर हद्दीत वरिष्ठ पोलीस निरीक्षक आसाराम चोरमले यांनी विनाकरण फिरणाऱ्यांवर दंडुका भिरकावला. दुपारी ३ वाजतानंतर उन्हाचा तडाखा वाढल्याने फिक्स पॉइंटवर पोलीस बंदोबस्त शिथिल करण्यात आला. मात्र, सायंकाळी ६ वाजतानंतर पुन्हा बंदोबस्त तैनात ठेवून कारवाई केली जाईल, असे संबंधित ठाणेदारांनी सांगितली.
बॉक्स
शहराच्या हद्दीवर बंदोबस्त
शहरात इतर तालुक्यातील येणाऱ्या नागरिकांना रोखण्यासाठी सात ठिकाणी नाकेबंदी पॉइंट लावले होते. त्याठिकाणी सुद्धा पोलीस पथक तैनात होते. वलगाव, भातकुली, वेलकम पाॅइंट, नांदगावपेठ, बडनेरा, व इतर ठिकाणी नाकेबंदी पॉईंट लावण्यात आले होते. दोन आरसीपीचे पथकही तैनात ठेवण्यात आल्याची माहिती पोलीस निरीक्षक शिवाजी बचाटे यांनी दिली.