अमरावतीत एका दिवसात १२ पॉझिटिव्ह; बाधितांची संख्या ४०
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: April 30, 2020 19:30 IST2020-04-30T19:29:37+5:302020-04-30T19:30:46+5:30
अमरावती येथील क्लस्टर हॉटस्पॉट व्यतिरिक्त शहराच्या इतरही भागात कोरोनाचा शिरकाव झाला. गुरुवारी दिवसभरात १२ अहवाल पॉझिटिव्ह आल्याने शहरात आता समूह संक्रमणाची भीती व्यक्त होत आहे. अमरावतीमध्ये कोरोनाग्रस्तांची संख्या आता ४० वर पोहचली आहे.

अमरावतीत एका दिवसात १२ पॉझिटिव्ह; बाधितांची संख्या ४०
लोकमत न्यूज नेटवर्क
अमरावती : येथील क्लस्टर हॉटस्पॉट व्यतिरिक्त शहराच्या इतरही भागात कोरोनाचा शिरकाव झाला. गुरुवारी दिवसभरात १२ अहवाल पॉझिटिव्ह आल्याने शहरात आता समूह संक्रमणाची भीती व्यक्त होत आहे. अमरावतीमध्ये कोरोनाग्रस्तांची संख्या आता ४० वर पोहचली आहे. यात ७ मृत, ४ कोरोनामुक्त, तर २९ व्यक्तींवर येथील कोविड रुग्णालयात उपचार सरू आहे.
येथील क्लस्टर हॉटस्पॉटमधील खोलापुरी गेटभागात बाधितांच्या संपर्कात आल्याने क्वारंटाईन करण्यात आलेल्या तीन महिला व दोन पुरुष, कंवर नगरातील दोन महिला व एक पुरुष, हनुमान नगरातील एक महिला तसेच नालसाबपुरा भागातील दोन महिला व एका व्यक्तीचा अहवाल गुरुवारी पॉझिटिव्ह आलेला आहे. २३ एप्रिल रोजी शहरात ९ कोरोनाग्रस्त होते, तर ३० एप्रिलला बाधितांची संख्या ४० झालेली असल्याने एका आठवड्यात कोरोनाग्रस्तांच्या संख्येत ३१ ने वाढली आहे. यामुळे शहरात कोरोनाचा आता गुणाकार सुरू झालेला आहे. यामुळे चिंता वाढली आहे.
२९४ स्वॅब अहवाल प्रलंबित
अमरावती जिल्ह्यातील १२२१ संशयितांचे थ्रोट स्वॅब नागपूर, अकोला व सेवाग्राम येथील प्रयोगशाळेत तपासणीला पाठविले आहेत. यापैकी ४० पॉझिटिव्ह, तर ९०० निगेटिव्ह आलेले आहेत. अद्यापही २७४ नमुन्यांचा अहवाल प्रलंबित आहे. काही नमुने नाकारण्यात आलेले आहेत. प्रलंबित नमुन्यांमध्ये किमान १०० अहवाल हायरिस्कचे असल्याची माहिती जिल्हाधिकारी शैलेश नवाल यांनी दिली.