अमरावती शहरातून वर्षभरात १२ हजार २५५ किलो सिंगल यूज प्लास्टिक जप्त
By उज्वल भालेकर | Published: April 8, 2024 09:11 PM2024-04-08T21:11:17+5:302024-04-08T21:11:29+5:30
महापालिकेची ११६ आस्थापनांवर कारवाई, ७ लाख ४० हजारांचा दंड केला वसूल
अमरावती : सिंगल युज प्लास्टिकवर (एकल वापर) बंदी असताना देखील शहरात मोठ्या प्रमाणावर या प्लास्टिकचा वापर होत आहे. त्यामुळे महापालिकेच्या वतीने सिंगल युज प्लास्टिकची विक्री करणाऱ्या आस्थापनांवर विशेष पथकांच्या माध्यमातून कारवाई मोहीम राबविण्यात येत आहे. २०२३-२४ या आर्थिक वर्षात महापालिकेने १२ हजार २५५ किलो प्लास्टिक जप्त केला असून, ११६ आस्थापनांकडून ७ लाख ४० हजार रुपयांचा दंडही वसूल केल्याची माहिती महापालिका प्रशासनाने दिली आहे.
वाढत्या प्लास्टिक प्रदूषणामुळे पर्यावरणाचा प्रश्न दिवसेंदिवस बिकट होत आहे. यावर उपाय म्हणून महाराष्ट्र प्रदूषण नियंत्रण मंडळाने सिंगल यूज प्लास्टिकच्या वापरावर बंदी आणून कठोर अंमलबजावणी करण्याचा निर्णय घेतला होता. त्यानुसार महापालिकेच्या वतीनेही शहरातील सिंगल यूज प्लास्टिकची विक्री तसेच वापर करणाऱ्या पथकांवर कारवाईसाठी विशेष पथके तयार केली आहेत. त्यामुळे शहरातील मुख्य बाजारपेठ, भाजी मार्केट, बसस्थानक तसेच इतर ठिकाणी होणाऱ्या प्लास्टिकच्या वापरावर महापालिका पथकांचे लक्ष असून, दंडात्मक कारवाई करण्यात येत आहे.
सिंगल यूज प्लास्टिकचे उत्पादन, वापर, वितरण, विक्री आणि साठवण यावर २०१८ च्या प्लास्टिक बंदी अधिनियमाद्वारे ही कारवाई करण्यात येत आहे. परंतु तरीही सिंगल यूज प्लास्टिकचा वापर अजूनही बंद झालेला नाही. त्यामुळे १ एप्रिल २०२३ ते ३१ मार्च २०२४ या आर्थिक वर्षात महापालिकेने राबविलेल्या कारवाई माेहिमेत १२ हजार २५५ किलो सिंगल यूज प्लास्टिक जप्त करून ७ लाख ४० हजारांचा दंड वसूल केला आहे.