१२ वेळा मान्सून लेटलतीफ
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: June 29, 2019 11:08 PM2019-06-29T23:08:59+5:302019-06-29T23:09:16+5:30
यंदा जून महिन्याची अखेर असतानाही मान्सूनचा पाऊस झालेला नाही. दोन दिवसांत तुरळक, तर २ जुलैनंतर सार्वत्रिक पावसाची शक्यता हवामानतज्ज्ञांनी वर्तविली आहे. मागील ६९ वर्षात तब्बल १२ वेळा मान्सूनने हुलकावणी देत जुलैमध्ये दाखल झाला. आजवर २००३ मध्ये २५ जुलै रोजी झालेले मान्सूनचे आगमन हे सर्वाधिक उशिराचे ठरले आहे, तर १९९० मध्ये ५ जून हे मान्सूनचे वेळेपूर्वीचे आगमन ठरले.
लोकमत न्यूज नेटवर्क
अमरावती : यंदा जून महिन्याची अखेर असतानाही मान्सूनचा पाऊस झालेला नाही. दोन दिवसांत तुरळक, तर २ जुलैनंतर सार्वत्रिक पावसाची शक्यता हवामानतज्ज्ञांनी वर्तविली आहे. मागील ६९ वर्षात तब्बल १२ वेळा मान्सूनने हुलकावणी देत जुलैमध्ये दाखल झाला. आजवर २००३ मध्ये २५ जुलै रोजी झालेले मान्सूनचे आगमन हे सर्वाधिक उशिराचे ठरले आहे, तर १९९० मध्ये ५ जून हे मान्सूनचे वेळेपूर्वीचे आगमन ठरले.
दरवर्षीच मान्सूनच्या आगमनात वैविध्य आहे. यंदा ‘एल निनो’चा फारसा प्रभाव नाही. त्यामुळे सरासरीइतपत पाऊस होण्याचे भाकीत हवामान विभागाने केले होते तसेच साधारणपणे १२ ते १५ जूनच्या दरम्यान विदर्भात मान्सून दाखल होईल, अशी शक्यता हवामानविभागाने वर्तविली होती. प्रत्यक्षात अरबी समुद्रात ‘वायू’ चक्रीवादळाच्या प्रभावामुळे मान्सूनची गती मंदावली व नियोजित वेळेपेक्षा पाच दिवस उशिरा मान्सूनची वाटचाल सुरू झाली. मागील आठवड्यात मुंबई अन् या चार दिवसांत मराठवाड्यात पाऊस होत असताना मध्य विदर्भात प्रामुख्याने अमरावती जिल्ह्यात पावसाने दाद दिलेली नाही.
कृषी विभागाच्या माहितीनुसार आतापर्यंत १२ वेळा मान्सूनचे आगमन वेळेवर झाले आहे. यामध्ये १९९० मध्ये ५ जून, २००० मध्ये ६ जून, १९८० मध्ये ७ जून, १९९४ मध्ये ७ जून, १९९१ मध्ये १० जून, १९९८ मध्ये ११ जून, २०१३ मध्ये ११ जून, २०१२ मध्ये १२ जून, १९७३ मध्ये १३ जून, १९९३ मध्ये १३ जून, तर १९७७ मध्ये १३ जून हे मान्सूनच्या वेळेवर आगमनाचे दिवस ठरले आहे.
यंदा मात्र जूनची अखेर असतानाही दमदार पाऊस झालेला नाही. किंबहुना रोहिणी व मृग नक्षत्र कोरडे गेल्यामुळे शेती मशागतीची कामे खोळंबली आहे. यंदा रोहिणीत प्रीमान्सूनचा पाऊस झालेला नाही. भूजलाची पातळी खालावल्याने विहिरींनी तळ गाठल्याने पूर्वमोसमी पेरण्या झालेल्या नाहीत. पावसात सातत्य नसल्यामुळे यंदा खरिपाच्या पेरण्या खोळंबल्या आहेत. याचा थेट परिणाम सरासरी उत्पादनावर होणार आहे.
जिल्ह्यात सरासरी
६० मिमी पाऊस
जिल्ह्यात १ ते २९ जून दरम्यान १४१ मिमी पावसाची सरासरी अपेक्षित असताना, प्रत्यक्षात ६० मिमी पावसाची नोंद झाली. मागील वर्षी याच दिनांकाला ८९.६ मिमी पाऊस पडला होता. यंदा अमरावती ६१.९, भातकुली ६१.२, नांदगाव ५९, चांदूर रेल्वे ६८, धामणगाव रेल्वे ८०.५, तिवसा १२.३, मोर्शी ४१.६, वरूड ३८.१, अचलपूर ५८.३, चांदूरबाजार ५८.६, दर्यापूर ५३.७, अंजनगाव सुर्जी ३७.४, धारणी ११५.८ व चिखलदरा तालुक्यात ९३.८ मिमी पाऊस पडला आहे.
हवामानाची सद्यस्थिती
हवामानतज्ज्ञ अनिल बंड यांच्या माहितीनुसार, ३ जुलैपर्यंत विदर्भात अनेक ठिकाणी हलक्या ते मध्यम पावसाची शक्यता आहे. काही ठिकाणी अतिवृष्टीदेखील होऊ शकते. त्यामुळे हवामान विभागाने अतिदक्षतेचा इशारा दिला आहे. ३ ते ५ जुलै दरम्यान बहुतेक ठिकाणी मध्यम पावसाची शक्यता आहे. खरिपाच्या पेरणीसाठी पोषक स्थिती निर्माण झाली आहे.
यंदा २३ जूनला मान्सूनचे आगमन झाले असले तरी सार्वत्रिक पाऊस झालेला नाही. आता १ जुलैनंतर दमदार पावसाची शक्यता आहे. शेतकऱ्यांनी ३० जूनपासून खरिपाच्या पेरणी करावयास हरकत नाही.
- अनिल बंड, हवामानतज्ज्ञ
मान्सूनचे उशिरा आगमन
कृषी विभागाकडे उपलब्ध असलेल्या माहितीनुसार, १९८२ मध्ये २० जुलै, १९८३ मध्ये १२ जुलै, १९८४ मध्ये १ जुलै, १९९५ मध्ये ९ जुलै, १९९६ मध्ये २१ जुलै, १९९९ मध्ये ९ जुलै, २००२ मध्ये १७ जुलै, २००३ मध्ये २५ जुलै, २००४ मध्ये १० जुलै, २०१० मध्ये ७ जुलै, २०१४ मध्ये ११ जुलै तसेच यंदादेखील जुलै महिना उजाडणार आहे. ४० वर्षांमध्ये मान्सूनचे १ ते ३० जूनच्या कालावधीत आगमन झालेले आहे.