कार उलटून 12 वर्षीय मुलाचा मृत्यू, बोपीनजीक अपघात
By ऑनलाइन लोकमत | Published: October 23, 2017 04:42 PM2017-10-23T16:42:46+5:302017-10-23T16:42:58+5:30
भरधाव कारचा रस्त्यावरील खड्डा चुकविण्याच्या प्रयत्नात नियंत्रण सुटल्याने अपघात झाला. यात नागपूर येथील कल्याणी कुटुंबीयातील १२ वर्षीय करणचा मृत्यू झाला.
अमरावती - भरधाव कारचा रस्त्यावरील खड्डा चुकविण्याच्या प्रयत्नात नियंत्रण सुटल्याने अपघात झाला. यात नागपूर येथील कल्याणी कुटुंबीयातील १२ वर्षीय करणचा मृत्यू झाला. ही घटना सोमवारी दुपारी ३ च्या सुमारास लोणी पोलीस ठाण्याच्या हद्दीतील बोपीनजीक भास्कर फूड्स प्रा.लि. कंपनीजवळ घडली.
नागपूरच्या नंदनवन सोसायटीत राहणारे प्रकाश कल्याणी हे पत्नी, मुलगा करण व मुलीसमवेत कारने शेगावी दर्शनासाठी निघाले होते. अमरावती-अकोला मार्गावर लोणी ते बोपीदरम्यान रस्ता अतिशय खराब झाला आहे. या रस्त्यातील खड्डे चुकवित असताना भरधाव कार अनियंत्रित होऊन रस्त्याखाली उतरून उलटली. करण हा खिडकीतून बाहेर पडताच त्याच्या अंगावर कार कोसळल्याची माहिती पोलिसांनी दिली. यामुळे करणचा घटनास्थळीच मृत्यू झाला, तर कल्याणी कुंटुबातील अन्य सदस्य किरकोळ जखमी झालेत. आजूबाजूच्या नागरिकांनी त्यांना कारबाहेर काढण्यास मदत केली. यानंतर त्यांना तातडीने रुग्णालयात दाखल करण्यात आले. लोणी पोलिसांनी करणचा मृतदेह शवविच्छेदनासाठी इर्विन रुग्णालयात आणला होता.