हॉकर्सकडून वसुलणार वर्षाकाठी १.२१ कोटी
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: April 13, 2022 05:00 AM2022-04-13T05:00:00+5:302022-04-13T05:00:51+5:30
महापालिका क्षेत्रातील अधिकृत व मंजूर हॉकर्स झोनसह अन्य जागांवर व्यवसाय करणाऱ्या फेरीवाल्यांकडून यापूर्वी प्रत्येकी पाच रुपये दिवसाकाठी वसूल करण्यात येत होते. तथापि, गत काही वर्षांपासून ही रक्कम १० रुपये करण्यात आली. २०१७ मध्ये तत्कालीन आयुक्त हेमंत पवार यांच्या कार्यकाळात त्यासाठी १.५३ कोटी रुपयांची निविदा काढण्यात आली. मात्र, निविदाधारक समोर आला नाही. त्यामुळे स्थानिक स्तरावर दैनंदिन वसुलीचे कंत्राट देण्यात आले.
लोकमत न्यूज नेटवर्क
अमरावती : महापालिका क्षेत्रात व्यवसाय करणाऱ्या फेरीवाल्यांकडून वर्षाकाठी १.२१ कोटी वसूल होण्याचा मानस महापालिका प्रशासनाने व्यक्त केला आहे. दैनिक शुल्क म्हणून ही रक्कम आकारण्यात येणार आहे. ११ एप्रिल रोजी त्यासाठीची निविदा काढण्यात आली. गतवर्षी शहरातील फेरीवाल्यांकडून २८ लाख शुल्क वसूल करण्यात आले होते.
महापालिका क्षेत्रातील अधिकृत व मंजूर हॉकर्स झोनसह अन्य जागांवर व्यवसाय करणाऱ्या फेरीवाल्यांकडून यापूर्वी प्रत्येकी पाच रुपये दिवसाकाठी वसूल करण्यात येत होते. तथापि, गत काही वर्षांपासून ही रक्कम १० रुपये करण्यात आली. २०१७ मध्ये तत्कालीन आयुक्त हेमंत पवार यांच्या कार्यकाळात त्यासाठी १.५३ कोटी रुपयांची निविदा काढण्यात आली. मात्र, निविदाधारक समोर आला नाही. त्यामुळे स्थानिक स्तरावर दैनंदिन वसुलीचे कंत्राट देण्यात आले. मात्र आता कोरोना काळ संपुष्टात आल्याने त्यासाठी १ कोटी २० लाख ९९ हजार ७५० रुपये किमतीची निविदा काढण्यात आली आहे. अर्थात महापालिकेकडे नोंदणीबद्ध असलेल्या ३३१५ हॉकर्सकडून १० रुपये दैनिक शुल्कापोटी वर्षभरात तितकी रक्कम महापालिकेच्या तिजोरीत जमा होण्याचा आशावाद प्रशासनाने बाळगला आहे.
शहरात ३३१५ नोंदणीबध्द हॉकर्स
सन २०१७ मध्ये महापालिकेच्या बाजार व परवाना विभागानुसार महापालिका क्षेत्रात ४१२८ फेरीवाल्यांनी नोंदणी केली होती. त्यापेकी १६५३ फेरीवाल्यांनी परवान्यासाठी आवश्यक असलेल्या कागदपत्रांची पूर्तता केली होती. मात्र, त्यानंतर शासनाने केलेल्या सर्वेक्षणात ती संख्या घटली. तूर्तास त्या सर्वेक्षणानुसार महापालिका हद्दीत एकूण ३३१५ नोंदणीबध्द फेरीवाले आहेत. पैकी २१०० जणांनी कागदपत्रांची पूर्तता केली आहे. ३३१५ ही संख्या डोळ्यासमोर ठेऊन १.२१ कोटी रुपये मूल्याची निविदा काढण्यात आली आहे.
कंत्राट एक वर्षांचे
महापालिका क्षेत्रातील सर्व फेरीवाल्यांकडून प्रतिदिन १० रुपये दैनिक फी वसुलीचे हे कंत्राट १ वर्षांचे असेल. विशेष म्हणजे महापालिकेच्या थकबाकीधारकास कंत्राट घेता येणार नाही. त्याला तो दुसऱ्याला देता देखील येणार नाही. फेरीवाल्यास पावती देताना त्यावर फेरीवाल्याचे नाव, झोन क्रमांक व मोबाईल नंबर टाकणे बंधनकारक असेल.