जिल्हा बँकेच्या मतदार यादीत १,२४२ प्रतिनिधीं
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: July 11, 2021 04:10 AM2021-07-11T04:10:34+5:302021-07-11T04:10:34+5:30
अमरावती : जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँकेच्या मतदार यादीकरिता अंतिम दिवसांपर्यंत १,२४२ सहकारी संस्थांचे ठराव जिल्हा उपनिबंधक कार्यालयास प्राप्त झाले ...
अमरावती : जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँकेच्या मतदार यादीकरिता अंतिम दिवसांपर्यंत १,२४२ सहकारी संस्थांचे ठराव जिल्हा उपनिबंधक कार्यालयास प्राप्त झाले आहे. या ठरावासह बँक प्रतिनिधीच्या पात्रतेची पडताळणी आता केली जाणार आहे. त्यानंतर १६ जुलै रोजी प्रारूप मतदार यादी तयार होणार आहे.
जिल्ह्यात कोरोनाचा संसर्ग कमी होताच जिल्हा बँकेच्या मतदार यादीचा कार्यक्रम सहकार प्राधिकरणाद्वारे पुन्हा सुरू करण्यात आला व सहकारी संस्थांद्वारे बँक प्रतिनिधी पाठविण्यासाठी ८ जुलै ही ‘डेडलाईन’ देण्यात आल्याने गावागावांत राजकारण पेटले. मुदतीत प्राप्त झालेले अहवाल तालुक्याच्या सहायक निबंधकांकडून जिल्हा उपनिबंधक कार्यालयास प्राप्त झालेले असल्याचे सहकार विभागाने सांगितले.
बँक प्रतिनिधी हा बँकेचा थकबाकीदार नसावा, ही यामधील प्रमुख अट असल्याने पुन्हा याविषयी पडताळणी केली जाणार आहे व त्यानंतर प्रारूप यादी तयार करण्यात येऊन २० जुलै रोजी या यादीला प्रसिद्धी दिली जाणार आहे. यावर दहा दिवसांत विभागीय सहनिबंधक कार्यालयाकडे आक्षेप नोंदविता येईल. ९ ऑगस्टला सुनावणी व १३ ऑगस्टला अंतिम यादी प्रसिद्ध होणार आहे.
बॉक्स
३०९ अवसायनात, १७७ ची नोंदणी रद्द
जिल्ह्यात साधारणपणे १८०० सहकारी संस्था आहे. यामधील ३०९ सहकारी संस्था अवसायनात असल्याने त्यांना बाद ठरविण्यात आले व त्या संस्थेचा बँक प्रतिनिधी पाठविण्यात येणार नाही. याशिवाय १७७ संस्थांची नोंदणी रद्द करण्यात आली आहे. अशा एकूण ४८६ संस्था मतदार यादीच्या कार्यक्रमात बाद झालेल्या आहेत. त्यामुळे सुरू असलेल्या १,२३२ व प्रशासक असलेल्या १४ संस्थांचेच बँक प्रतिनिधी यादीमध्ये राहणार आहेत.
बॉक्स
तालुकानिहाय ठरावप्राप्त बँक प्रतिनिधी
जिल्ह उपनिबंधक कार्यालयाने दिलेल्या माहितीनुसार, अमरावती तालुक्यात सवार्धिक ३३३, भातकुली ५१, नांदगाव खंडेश्वर ४८, मोर्शी ९०, वरूड १२३, चांदूर रेल्वे ३८, धामणगाव रेल्वे ५३, तिवसा ६१, दर्यापूर ११३, अचलपूर ७३, धारणी २४, चिखलदरा २५, अंजनगाव सुर्जी ९२, चांदूर बाजार ७८ असे एकूण १,२०२ व पद्मचे ४० प्रतिनिधी असे एकूण १,२४२ प्रतिनिधींचे ठराव सध्या प्राप्त असल्याचे सहकार विभागाने सांगितले.
कोट
जिल्हा बँकेसाठी साधारणपणे १,२४२ संस्थांचे ठराव प्राप्त झाले. या प्रतिनिधींची आता पडताळणी करण्यात येणार आहे व त्यानंतर प्रारूप यादी तयार होईल.
- संदीप जाधव, जिल्हा उपनिबंधक (सहकारी संस्था)