Coronavirus in Amravati; अमरावती जिल्ह्यात १२.५७ लाख तरुणाईचे लसीकरण प्रतीक्षेत
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: May 13, 2021 06:26 PM2021-05-13T18:26:49+5:302021-05-13T18:28:24+5:30
Amravati news अमरावती जिल्ह्यात चार दिवसांपासून लसीकरण प्रशासनाने थांबविले आहे. या नव्या सूचनेमुळे १२ लाख ५७ हजार ५२७ तरुणाईला किमान दोन आठवडे कोरोना प्रतिबंधक लस घेण्यासाठी प्रतीक्षेतच राहावे लागणार आहे.
लोकमत न्यूज नेटवर्क
अमरावती : मागणीच्या तुलनेत लसींचा पुरवठा होत नसल्याने १८ ते ४४ या वयोगटातील लसीकरणाला सध्या शासनाने स्थगिती दिली. जिल्ह्यात तसेही चार दिवसांपासून या वयोगटातील लसीकरण प्रशासनाने थांबविले आहे. या नव्या सूचनेमुळे १२ लाख ५७ हजार ५२७ तरुणाईला किमान दोन आठवडे कोरोना प्रतिबंधक लस घेण्यासाठी प्रतीक्षेतच राहावे लागणार आहे.
कोरोना प्रतिबंधासाठी त्रिसूत्रीसह कोरोना प्रतिबंधात्मक लसीकरण महत्त्वाचे आहे. जिल्ह्यात १८ ते ४४ वयोगटात सर्वाधिक नागरिक आहेत. प्रशासनाद्वारा १ मेपासून या वयोगटासाठी ऑनलाईन नोंदणी व अपाॅइंटमेंट घेऊन लसीकरण सुरू केले होते. मात्र, लसीचा पुरवठा नसल्यामुळे बहुतांश केंद्र बंदच आहे. आता लसीचा साठा व पुरवठा तोकडा असल्याने या वयोगटातील लसीकरणाला अधिकृतरीत्या स्थगिती दिलेली आहे.
प्रत्यक्षात ४५ वर्षांवरील नागरिकांचे लसीकरण पहिल्यांदा करण्याच्या सूचना शासनाद्वारा प्रशासनाला देण्यात आलेल्या आहे. या वयोगटासह ६० वर्षांवरील ज्येष्ठ नागरिक अशा एकूण १.५५ लाख नागरिकांना दुसरा डोस घ्यायचा आहे. अशा परिस्थितीत ज्या नागरिकांनी पहिला डोस घेऊन ४२ दिवस झाले आहे. त्यांनाच दुसरा डोस देणे महत्त्वाचे आहे. प्रत्यक्षात मागणीच्या तुलनेत लसींचा पुरवठा कमी असल्यामुळे ज्येष्ठ नागरिकांना दुसरा डोस देण्यासाठी शासनस्तरावरून सूचना देण्यात आलेल्या आहेत. लसींची उपलब्धी पाहता जिल्ह्यात चार दिवसांपासून या वयोगटातील नागरिकांना दुसरा डोस देणे सुरू केल्याने १८ ते ४४ वयोगटातील नागरिकांना लसीकरणासाठी प्रतीक्षा करावी लागत आहे.
जिल्ह्यात लसीकरणाची स्थिती
जिल्ह्यात आतापर्यंत २,८५,३८० कोव्हॅक्सिन व ७१,९२० कोव्हिशिल्डचे डोस प्राप्त आहेत. यामध्ये ३,६०,८४० नागरिकांचे लसीकरण करण्यात आलेले आहे. यात हेल्थ केअर वर्कर ३०,७४२, फ्रंटलाईन वर्कर ३२,५३०, १८ ते ४४ वयोगटांत १८,३६० व ४५ ते ५९ वयोगटांत १,१२,११९ तसेच ६० वर्षांवरील १,६७,०८९ नागरिकांचे आतापर्यंत लसीकरण करण्यात आलेले आहे.
लसीअभावी १०० वर केंद्रे बंद
जिल्ह्यात कोरोना प्रतिबंधात्मक लसीकरणासाठी १३५ केंद्रे आहेत. यामध्ये १८ केंद्रे महापालिका क्षेत्रात, तर ११७ केंद्रे ही जिल्हा ग्रामीणमध्ये आहेत. यांपैकी १०० वर लसींच्या अभावामुळे बंद असल्याची माहिती आहे. सद्य:स्थितीत मेळघाट वगळता सर्वच तालुक्यांतील केंद्रांवर लसीकरणासाठी नागरिकांच्या रांगा आहेत. लवकर नंबर लावावा यासाठी नागरिक पहाटे चार वाजल्यापासून रांगेत उभे राहत असल्याचे चित्र आहे.