वादळाने धारणी तालुक्यात १.२७ कोटींचे नुकसान; अवकाळीचा फटका
By गजानन उत्तमराव मोहोड | Published: April 12, 2023 05:43 PM2023-04-12T17:43:12+5:302023-04-12T17:43:57+5:30
पिकांचे पंचनामे पूर्ण, शासनाला अहवाल
अमरावती : जिल्ह्यात ३१ मार्चला धारणी तालुक्यात जोरदार वादळासह अवकाळी पावसाने दणका दिला. यामध्ये ७४२ हेक्टरमध्ये मोठे नुकसान झाले होते, या बाधित क्षेत्राचे पंचनामे आता पूर्ण झाले असून जिल्हा प्रशासनाने १,२६,१७,०६० रुपयांची मागणी शासनाकडे केली आहे.
जिल्हा प्रशासनाच्या माहितीनूसार या आपत्तीमुळे ९२७ शेतकऱ्यांचे नुकसान झाले आहे. यामध्ये ४२२ हेक्टरमधील गहू, ९४ हेक्टरमधील हरभरा, १२७ हेक्टरमधील मका, १०० हेक्टरमधील उन्हाळी मूग पिकाचे ३३ टक्क्यांवर नुकसान झाल्याचे पंचनाम्याअंती स्पष्ट झाले आहे. या बाधित पिकांना आता एसडीआरएफच्या सुधारित निकषाप्रमाणे मदत देय राहणार आहे.
तहसील प्रशासनाद्वारा बाधित शेतकऱ्यांच्या याद्या पोर्टलवर अपलोड करण्यात येतील व त्यानंतर या आपत्तीसाठी शासन निधी मंजूर झाल्यानंतर बाधित शेतकऱ्यांच्या खात्यात शासनस्तरावरुन मदत जमा करण्यात येणार असल्याची माहिती जिल्हा प्रशासनाने दिली.