१३ एकरांतील सोयाबीनवर फिरविला ट्रॅक्टर
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: October 25, 2017 11:05 PM2017-10-25T23:05:41+5:302017-10-25T23:05:52+5:30
पेरणीनंतर पावसाने दिलेली दडी, नंतर अत्यल्प उगवण झालेले सोयाबीन व शेवटी अवकाळी पावसाचा कहर यामुळे हैराण केल्याने कापणीचाही खर्च निघण्याची शक्यता मावळल्याने कळमखार ....
लोकमत न्यूज नेटवर्क
धारणी : पेरणीनंतर पावसाने दिलेली दडी, नंतर अत्यल्प उगवण झालेले सोयाबीन व शेवटी अवकाळी पावसाचा कहर यामुळे हैराण केल्याने कापणीचाही खर्च निघण्याची शक्यता मावळल्याने कळमखार येथील जवरे बंधूंनी १३ एकर शेतातील सोयाबीन पिकावर ‘रोटाव्हेटर’ फिरविले. मेळघाटात एवढ्या मोठ्या प्रमाणावर नुकसान झाल्याची ही तालुक्यातील बहुदा पहिलीच घटना असावी.
धारणी येथील विजय सोहनलाल जवरे व त्यांचे धाकटे बंधू गिरीश सोहनलाल जवरे यांच्या संयुक्त मालकीचे मौजा कळमखार येथे एकूण ५ हेक्टर ४५ आर शेत आहे. यावर्षी खरीप हंगामात जवरे बंधूंनी संपूर्ण मशागत करून पूर्ण शेतात सोयाबीनचा पेरा केला होता. मात्र, पेरणीनंतर पावसाने दगा दिला. यानंतरही काही प्रमाणात सोयाबीन उगवले. ते सोंगण्याच्या स्थितीत आले असतानाच अवकाळी पावसाने कहर केला. परिणामी सोयाबीन धुळीस मिळाले. त्यामुळे आता कापणीचाही खर्च निघणार नसल्याचे पाहून दोन्ही भावांनी मंगळवारी शेतावरील सोयाबीन पिकावर रोटावेटर फिरवून शेत साफ केले. या संपूर्ण १३ एकराच्या शेतावर एकूण अंदाजे दीड लाखांचा खर्च करण्यात आला. तो वाया गेल्याने जवरे बंधूंवर संकट ओढावले आहे. याची दखल घेऊन नुकसानभरपाई देण्यात यावी, अशी मागणी जवरे बंधूंनी शासनाकडे केली आहे.
कळमखार, धूळघाट, भोकरबर्डी, खापरखेडा यांंसह सर्व तालुक्यात यंदा खरीप हंगाम पावसाच्या लहरीवर वाया गेल्याने शेतकरी संकटात सापडला आहे.