दोन महिला संचालकपदासाठी १३ उमेदवार मैदानात
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: September 15, 2021 04:17 AM2021-09-15T04:17:23+5:302021-09-15T04:17:23+5:30
अमरावती : जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँक निवडणुकीत २१ पैकी दाेन महिला संचालक निवडून द्यावे लागणार आहे. मात्र, दोन संचालकपदासांठी ...
अमरावती : जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँक निवडणुकीत २१ पैकी दाेन महिला संचालक निवडून द्यावे लागणार आहे. मात्र, दोन संचालकपदासांठी १३ महिला उमेदवारांचे नामांकन दाखल असल्याने पॅनेलमध्ये सामावून घेताना नेत्यांची कसरत होत आहे. ४ ऑक्टोबर रोजी बँकेची निवडणूक होणार आहे. त्याअनुषंगाने उमेदवारांनी प्रचाराला वेग आणला आहे.
आता मतदारांच्या थेट भेटीगाठींना महत्त्व दिले जात आहे. तूर्त पॅनेल घोषित व्हायचे असले तरी उमेदवार मात्र आपण अमूक पॅनेलमधून उमेदवार राहूच, अशी ठाम धारणा आहे. त्यानुसार महिला उमेदवारांनी प्रचारात आघाडी घेतली आहे. कोणत्याही पॅनलमध्ये सामावून घेतले नाही, तर काही दिग्गज महिला उमेदवार स्वतंत्रपणे मैदानात राहतील, असे चित्र आहे. यावेळी बँक निवडणुकीत महिला उमेदवारांकडून नामांकनाची संख्या वाढल्याने कोण कोणत्या पॅनेलमधून ‘शड्डू’ ठोकतील, हे २२ सप्टेंबरनंतरच स्पष्ट होणार आहे. २१ संचालकपदासाठी १,६८६ मतदार मतदानाचा हक्क बजावतील. ‘विड्रॉल’नंतर महिला उमेदवार कोणत्या पॅनेलमध्ये आहेत, हे २३ सप्टेंबर रोजी घोषित होणार आहे.
-----------------
सहकार नेत्यांची डोकेदुखी वाढली
२१ संचालकपदासाठी १०५ उमेदवारांनी नामांकन दाखल केले आहे. सहकारविरूद्ध परिवर्तन अशा दोन पॅनेलमध्ये थेट लढतीचे चित्र दिसून येत आहे. मात्र, दोन महिला संचालकपदासाठी १३ नामांकन असल्याने कोणत्या महिला उमेदवारांना पॅनेलमध्ये संधी मिळते, हे २३ सप्टेंबर रोजी स्पष्ट होणार आहे. दिग्गज, नामवंत महिलांचेही नामांकन असल्याने कुणाला डावलावे आणि कुणाला पॅनेलमध्ये घ्यावे, याबाबत निर्णय घेताना सहकार नेत्यांची डाेकेदुखी वाढली आहे. किंबहुना काही महिला उमेदवारांना पॅनलमध्ये सामावून घेताना ’राजकीय गेम’ करण्याची शक्यता नाकारता येत नाही, हे विशेष.
-------------------
राजकुमार पटेल, जयश्री देशमुख अपिलावर १७ ला सुनावणी
आमदार राजुकमार पटेल, जयश्री देशमुख यांचे नामांकन अवैध ठरविण्यात आले आहे. त्याअनुषंगाने मंगळवारी जबाब नोंदविण्यात आले आहे. राजकुमार पटेल यांचे अनुसूचित जाती, जमाती तर, जयश्री देशमुख यांचे महिला राखीव प्रवर्गासाठी सुनावणी महाराष्ट्र सहकारी अधिनियम १९६० चे कलम १५१ अंतर्गत विभागीय सहनिबंधक राजेंद्र दाबेराव यांच्याकडे १७ सप्टेंबर रोजी सुनावणी होणार आहे.