१३ सरपंचांच्या कर्तृत्त्वाचा 'लोकमत'तर्फे गौरव
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: February 23, 2018 12:44 AM2018-02-23T00:44:17+5:302018-02-23T00:46:26+5:30
ग्रामविकासातही भरीव योगदान देणाऱ्या जिल्ह्यातील १३ कर्तबगार सरपंचांना गुरूवारी येथील संत ज्ञानेश्र्वर सांस्कृतिक सभागृहात आयोजित शानदार समारंभात ‘लोकमत सरपंच अवॉडर््स’ २०१८ ने सन्मानित करण्यात आले.
ऑनलाईन लोकमत
अमरावती : ग्रामविकासातही भरीव योगदान देणाऱ्या जिल्ह्यातील १३ कर्तबगार सरपंचांना गुरूवारी येथील संत ज्ञानेश्र्वर सांस्कृतिक सभागृहात आयोजित शानदार समारंभात ‘लोकमत सरपंच अवॉडर््स’ २०१८ ने सन्मानित करण्यात आले. वरूड तालुक्यात गव्हाणकुंडचे सरपंच प्रदीप मुरूमकर हे यंदाच्या 'सरपंच आॅफ दी इयर'चे मानकरी ठरले.
मंचावर प्रमुख अतिथी आमदार वीरेंद्र जगताप, माजी आमदार भैयासाहेब ठाकूर, जिल्हाधिकारी अभिजित बांगर, अमरावती परिक्षेत्राचे विशेष पोलीस महानिरीक्षक सी.एच.वाकडे, मुख्य कार्यकारी अधिकारी के.एम.अहमद, बीकेटी टायर्सचे एरिया मॅनेजर जुबेर शेख, नेत्रानंद अंबाडेकर, प्रभात कुमार, महिंद्रा ट्रॅक्टर्सचे नीलेश जोशी, डीलर सोहन कलंत्री तसेच 'लोकमत'चे उपमहाव्यवस्थापक सुशांत दांडगे आणि संपादकीय प्रमुख गणेश देशमुख हे उपस्थित होते.
या पुरस्कारांसाठी पहिल्याच वर्षी जिल्ह्यातून उत्स्फूर्त प्रतिसाद लाभला. ३१९ ग्रामपंचायतींनी विविध क्षेत्रांत केलेल्या उल्लेखनीय कामांची नोंद असलेले प्रस्ताव सादर केले. सक्षम परीक्षकांच्या चमूने त्यातून सर्वोत्तम सरपंचांची श्रेणीनिहाय निवड केली. सर्व प्रमुख पाहुण्यांच्या हस्ते विजेत्यांना पुरस्कार वितरीत करण्यात आलेत. यावेळी पुरस्कार विजेत्यांना गहिवरून आल्याचे भावनिक चित्र मंचावर अनेकदा बघता आले. पाहुण्यांनी उपस्थितांना समयोचित मार्गदर्शन केले. बीकेटी टायर्स प्रायोजक, महिंद्रा ट्रॅक्टर्स व पतंजली आयुर्वेद हे सहप्रायोजक असलेल्या या पुरस्कारांचा उद्देश गावागावांतील विकास कामांची नोंद घेऊन त्यासाठी स्पर्धात्मक वातावरण तयार करणे हा आहे.