सावधान! स्क्रब टायफसचे १३ पॉझिटिव्ह; आरोग्य यंत्रणा 'हाय अलर्ट'वर, ग्रामीण भागातही शिरकाव

By जितेंद्र दखने | Published: September 20, 2022 05:55 PM2022-09-20T17:55:16+5:302022-09-20T17:56:41+5:30

अमरावती जिल्ह्यात स्क्रब टायफसचे १३ जण पॉझिटिव्ह आढळले आहेत. 

13 persons have been found positive for scrub typhus in Amravati district | सावधान! स्क्रब टायफसचे १३ पॉझिटिव्ह; आरोग्य यंत्रणा 'हाय अलर्ट'वर, ग्रामीण भागातही शिरकाव

सावधान! स्क्रब टायफसचे १३ पॉझिटिव्ह; आरोग्य यंत्रणा 'हाय अलर्ट'वर, ग्रामीण भागातही शिरकाव

Next

अमरावती : एकीकडे जिल्ह्यातील आरोग्य यंत्रणा 'लम्पी'मुळे हाय अलर्ट मोडवर असताना जिल्ह्यात स्क्रब टायफसचे तब्बल १३ रुग्ण पॉझिटिव्ह आढळल्याने चिंतेत भर पडली आहे. ऑगस्ट ते सप्टेंबर या जवळपास दीड महिन्याच्या कालावधीत आरोग्य विभागाने शहरासह जिल्ह्यातील ४८ नमुने तपासणीसाठी पाठविले होते. त्यात १३ रुग्ण स्क्रब टायफस या आजाराने बाधित झाल्याचे निष्पन्न झाले आहे. यात शहरात ४ आणि ग्रामीण भागात ८ व १ रुग्ण बाहेरचा असल्याचे आरोग्य विभागाकडून सांगण्यात आले.

याबाबत आरोग्य सेवा संचालनालयाचे आरोग्य संचालक डॉ. नितीन अंबाडकर यांनी जिल्हा आरोग्य अधिकारी तसेच जिल्हा हिवताप अधिकारी यांना स्क्रब टायफस या आजारामध्ये करावयाचे कीटकशास्त्रीय सर्वेक्षण व प्रतिबंधात्मक उपाययोजना करण्याच्या सूचना लेखी आदेशाद्वारे दिल्या आहेत. स्क्रब टायफस संसर्गाचा वाढता प्रकोप लक्षात घेता आरोग्य विभागाच्या वतीने आरोग्य यंत्रणा सतर्क राहण्याचे निर्देश देण्यात आले आहेत. कोणत्याही भागात रुग्ण आढळल्यास त्या ठिकाणी तीन तासांत पोहोचून उपाययोजना करण्याच्या सूचना दिलेल्या आहेत.

असा होतो आजार
ट्रॉम्बिक्युलिड माइट्सचे लारव्हा ज्याला चिगर माइट्स म्हणतात. त्याच्यातील ओरिएन्शिया सुक्ष्म जंतूमुळे 'स्क्रब टायफस' होतो. गंभीर अवस्थेतील रुग्णांमध्ये ३० टक्केपर्यंत रुग्णांचा मृत्यू धोका असतो.

कुठे आढळतात किटक
हे किटक गवत, शेत, जंगल, लॉन, तलाव, झरे आदी भागांत आढळतात.
हे किटक लाल, शेंदरी, पिवळ्या रंगाचे असतात. 
पूर्ण वाढ झालेले कीटक चावा घेत नाहीत. 
लारव्हा स्वरूपात असलेले किटकच चावा घेतात.

पाच ते वीस दिवसांनी दिसतात लक्षणे
किटक चावल्यानंतर पाच ते वीस दिवसांनी रोगाची लक्षणे दिसायला लागतात. सुरुवातीला ताप, डोकेदुखी, हातपाय दुखणे, मळमळ, ओकाऱ्या आणि इतर तापाच्या रोगासारखी लक्षण असतात. त्यामुळे बऱ्याच रुग्णांमध्ये मलेरिया, विषमज्वर किंवा डेंग्यू असण्याची शक्यता वर्तवली जाते. ज्या ठिकाणी चिगर चावतो त्या ठिकाणी एक व्रण असतो, ज्याला इशर म्हणतात. हा दिसला तर रोगनिदान नक्की झाले असे समजण्यात येते. परंतु ४० टक्के रुग्णांमध्ये हा इशर दिसत नाही. कपड्याने झाकलेल्या भागात तो असला तर दिसणआणखीच कठीण होतं. या आजारासाठी प्रतिबंधक लस नाही. लवकर निदान, लोकांचे जनजागरण, उंदरांवर नियंत्रण मिळवलं तर स्क्रब टायफस आटोक्यात येऊ शकतो.

सध्या स्क्रब टायफसचे रूग्ण आढळून येत असल्याने शेतात काम करत असताना पूर्ण अंगभर कपडे घालावे, झाडेझुडपे असलेल्या ठिकाणी काम करण्याचे टाळावे, ताप व अन्य लक्षणे आढळल्यास तातडीने जवळच्या रूग्णालयात जावून उपचार घ्यावे, असे आवाहन जिल्हा हिवताप अधिकारी डॉ. शरद जोगी यांनी केले आहे. 

 

Web Title: 13 persons have been found positive for scrub typhus in Amravati district

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.