१३ वर्षीय मुलगी गर्भवती, तपासणीसाठी गेल्याने उघड झाला प्रकार; पालकांसह डॉक्टरांनाही बसला धक्का
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: June 23, 2022 05:20 PM2022-06-23T17:20:51+5:302022-06-23T18:17:48+5:30
महिला पोलीस अधिकाऱ्यांनी त्या मुलीला विश्वासात घेऊन विचारणा केली. मात्र, आपल्यावर कुणीही बळजबरी केली नाही, आपला कुणाशीही संबंध आला नाही, असा दावा त्या मुलीने केला.
अमरावती : अमरावतीत एक १३ वर्षीय मुलीला दोन महिन्याची गर्भधारणा झाल्याची घटना राजापेठ पोलीस ठाण्याच्या हद्दीत बुधवारी उघड झाली. यात स्वत: ठाणेदारांनी सरकारतर्फे फिर्याद नोंदविली तथा एका १७ वर्षीय मुलाविरुद्ध बलात्कार व पॉक्सो अन्वये गुन्हा दाखल करण्यात आला.
राजापेठ पोलीस ठाण्याच्या हद्दीत राहणारे पालक आपल्या १३ वर्षीय मुलीला घेऊन राजापेठ भागातील एका महिला डाॅक्टरकडे गेले. मुलीच्या ओटीपोटीत दुखत असल्याचे त्यांनी सांगितले. तपासणीदरम्यान ती १३ वर्षीय मुलगी चक्क दोन महिन्याची गर्भवती झाल्याचे दिसून आले. त्यामुळे तिच्या पालकांसह डॉक्टरांनाही धक्का बसला. याबाबत संबंधित महिला डॉक्टरने राजापेठ पोलिसांना माहिती दिली. त्यावर ठाणेदार मनीष ठाकरे यांनी महिला पोलीस अधिकाऱ्यांसमवेत संबंधित रुग्णालय गाठले. तेथे महिला पोलीस अधिकाऱ्यांनी त्या मुलीला विश्वासात घेऊन विचारणा केली. मात्र, आपल्यावर कुणीही बळजबरी केली नाही, आपला कुणाशीही संबंध आला नाही, असा दावा त्या मुलीने केला.
ती काहीही सांगण्यास तयार नव्हती. त्यामुळे जबाबदारी व कर्तव्य म्हणून ठाणेदार मनीष ठाकरे यांनी २० जून रोजी सरकारतर्फे अज्ञात आरोपीविरुद्ध बलात्कार व पॉक्सो अन्वये गुन्हा दाखल केला. याबाबत बालकल्याण समितीला माहिती देण्यात आली तथा जिल्हा स्त्री रुग्णालयात तिची तपासणी करून बयाण नोंदविण्यात आले. २१ जून रोजी तिला विश्वासात घेऊन विचारपूस करण्यात आली तथा तिचे समुपदेशन करण्यात आले.
असा लागला त्याचा शोध
आपला कुणाशीही संबंध आला नाही, यावर ती मुलगी ठाम राहिली. मात्र, राजापेठ पोलिसांनी तपासाची चक्रे वेगाने फिरविली. त्या मुलीच्या भाड्याच्या खोलीजवळचा एक अन्य अल्पवयीन भाडेकरू तिच्यावर पतीसारखा दबाव टाकत होता, त्याची वागणूकदेखील तशीच होती. तिच्या कुटुंबीयांसह काही शेजाऱ्यांनी त्याला दुजोरा दिला. पुरेशी चौकशी व तपासानंतर त्या अल्पवयीन मुलीच्या गर्भधारणेला तो १७ वर्षीय अल्पवयीन भाडेकरू कारणीभूत असल्याच्या निष्कर्षाप्रत राजापेठ पोलीस पोहोचले. त्या विधिसंघर्षग्रस्त बालकाविरुद्ध बलात्कार व पॉक्सो अन्वये गुन्हा दाखल केल्याची माहिती राजापेठचे ठाणेदार मनीष ठाकरे यांनी दिली. गुन्हा दाखल झाल्याची कुणकुण लागताच तो अल्पवयीन मुलगा शहरातून पसार झाला आहे.