आयएमएच्या १,३०० डॉक्टरांचा संप
By admin | Published: March 24, 2017 12:11 AM2017-03-24T00:11:36+5:302017-03-24T00:11:36+5:30
धुळे येथील सर्वोपचार रूग्णालयातील आरएमओला रूग्णांच्या नातलगांनी केलेल्या मारहाणीच्या निषेधार्थ तसेच डॉक्टरांच्या सुरक्षेचा मुद्दा
अमरावती : धुळे येथील सर्वोपचार रूग्णालयातील आरएमओला रूग्णांच्या नातलगांनी केलेल्या मारहाणीच्या निषेधार्थ तसेच डॉक्टरांच्या सुरक्षेचा मुद्दा पुढे करून इंडियन मेडिकल असोसिएशन (आयएमए)च्यावतीने वैद्यकीय सेवा बेमुदत बंद ठेवण्याचा निर्णय घेतल्यामुळे शहरातील रूग्णांचे हाल होत आहेत. मात्र, संपादरम्यानदेखील गंभीर रूग्णांना सेवा पुरविण्याचा निर्णय वैद्यकीय संघटनेने घेतला आहे.
आयएमए संघटनेशी जुळलेल्या अंदाजे १,३०० खासगी डॉक्टरांनी त्यांच्या रूग्णालयांचा बाह्यरूग्ण विभाग (ओपीडी) बेमुदत बंद केली आहे. त्यामुळे गुरूवारी विविध आजारांवर उपचार करून घेण्यासाठी विविध रूग्णालयांमध्ये आलेल्या रूग्णांना आल्यापावली परतावे लागले. रूग्णांची यामुळे चांगलीच अडचण झाली.
धुळ्याच्या घटनेचा निषेध करण्यासाठी व आंदोलनाची पुढील रूपरेषा ठरविण्यासाठी आयएमए हॉलमध्ये तज्ज्ञ डॉक्टर, पदाधिकाऱ्यांची महत्त्वपूर्ण बैठक दुपारी ११ वाजता व सायंकाळी ६ वाजता पार पडली. यामध्ये मुंबई आयएमएच्या अध्यक्षांनी दिलेल्या गाईडलाईन्सनुसार चर्चा करण्यात आली. आयएमएचे अमरावतीचे अध्यक्ष तथा राज्य उपाध्यक्ष वसंत लुंगे, दिनेश साखरे, बी.आर.देशमुख, दिनेश वाघाडे, पंकज घुंडियाल, अलका कुथे, विजय कुथे, पी.आर.सोमवंशी, श्रीगोपाल राठी, दिनेश वाघाडे, नितीन राठी, आशिष साबू, गोपाल बेलोकार आदी उपस्थित होते. या आंदोलनाला केमिस्ट अॅन्ड ड्रगिस्ट असोसिएशन, डेन्टिस्ट असोसिएशने समर्थन जाहीर केले.
शासकीय, निमशासकीय रुग्णालयाची सेवा सुरु
शहरातील जिल्हा रुग्णालय (इर्विन), जिल्हा स्त्री रुग्णालय (डफरीन), सुपर स्पेशालिटी हॉस्पिटल व पीडीएमसीची वैद्यकीय सेवा सुरू ठेवण्याचा निर्णय आयएमएद्वारे घेण्यात आला आहे. याकरिता पीडीएमसीमध्ये एमबीबीएस व पीजीचे शिक्षण घेणारे विद्यार्थी डॉक्टरांच्या आंदोलनासाठी एकवटले होते. गंभीर रुग्णांची काळजी घेण्यात येत आहे. त्यामुळे डॉक्टरांच्या बेमुदत बंददरम्यान रूग्णांना होणारा त्रास कमी होईल.