लंडनमधील इस्टेटची बतावणी, १.३४ लाखांनी लुबाडले
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: April 24, 2021 04:15 PM2021-04-24T16:15:40+5:302021-04-24T16:16:04+5:30
Amravati news लंडनमधील एका व्यक्तीच्या मृत्यूनंतर त्याच्या खात्यातील रक्कम ट्रान्सफर करण्याच्या नावावर येथील एका ४५ वर्षीय इसमाची सुमारे १ लाख ३४ हजार रुपयांनी फसवणूक करण्यात आली.
लोकमत न्यूज नेटवर्क
अमरावती : लंडनमधील एका व्यक्तीच्या मृत्यूनंतर त्याच्या खात्यातील रक्कम ट्रान्सफर करण्याच्या नावावर येथील एका ४५ वर्षीय इसमाची सुमारे १ लाख ३४ हजार रुपयांनी फसवणूक करण्यात आली. याप्रकरणी अचलपूर पोलिसांनी २२ एप्रिल रोजी दुपारी अज्ञाताविरूद्ध भादंविचे कलम ४२० व आयटी अॅक्टअन्वये गुन्हा दाखल केला.
१ मार्च ते २४ मार्च दरम्यान हा प्रकार घडला. अचलपुरातील गुलाबबागजवळ राहणाऱ्या एका ४५ वर्षीय व्यक्तीशी एका अनोळखी आरोपीने फेसबुकद्वारे चॅटिंग केली. संवादादरम्यान आरोपीने फिर्यादीचा व्हाट्सअॅप क्रमांक घेतला. अन्य एका आरोपीचा मोबाईल क्रमांक देऊन संवादात भर घातली. पुढे त्यांच्यात व्हॉट्सअॅप चॅटदेखील सुरू झाले. त्यादरम्यान लंडनमधील एका अज्ञात व्यक्तीचा मृत्यू झाला. त्याच्या खात्यात वारसाहक्काने ८५ कोटी ६३ लाख रुपये आहेत, ती तुमच्या खात्यात ट्रान्सफर करतो, अशी बतावणी केली. मात्र, त्यासाठी काही आर्थिक सोपस्कार व बॅकिंग चार्ज म्हणून काही रक्कम खर्च करावी लागेल, असेही सांगितले. त्यादरम्यान आरोपीने फिर्यादीचा खाते क्रमांक घेतला. वारंवार पैशाची मागणी केली. फिर्यादीने देखील विश्वास ठेवत तब्बल १ लाख ३४ हजार रुपये आरोपीच्या खात्यात ऑनलाईन भरणा केला. मात्र, फसवणूक होत असल्याची जाणीव त्यांना झाल्यानंतर त्या ४५ वर्षीय स्थानिकाने अचलपूर पोलिसांत धाव घेतली. अचलपूर पोलिसांनी अज्ञाताविरूद्ध तक्रार नोंदवून घेत गुन्हा दाखल केला.
------------