‘तो’ पसार; मात्र पोलिसांना सापडले घबाड!

By प्रदीप भाकरे | Published: January 13, 2023 05:34 PM2023-01-13T17:34:59+5:302023-01-13T17:36:26+5:30

प्राणघातक हल्ल्याच्या गुन्ह्यातील फरार आरोपीच्या घराची झाडाझडती

13.50 lakh seized from the house of absconding accused in the crime of assault | ‘तो’ पसार; मात्र पोलिसांना सापडले घबाड!

‘तो’ पसार; मात्र पोलिसांना सापडले घबाड!

Next

अमरावती : तत्कालिन पोलीस आयुक्तांच्या विशेष पथकाचे प्रमुख तथा सहायक पोलीस निरिक्षक योगेश इंगळे यांच्यावर प्राणघातक हल्ला केल्याप्रकरणी फरार असलेल्या अहफाज अहमद एजाज अहमद (४२, रा. जाकीर कॉलनी, अमरावती) याच्या घरातून १३ लाख ४० हजार ४०० रुपयांची बेहिशोबी रोकड जप्त करण्यात आली. गाडगेनगर व नागपुरी गेट पोलिसांच्या संयुक्त पथकाने १२ जानेवारी रोजी मध्यरात्री ही धाडसी कारवाई केली.

पोलीस आयुक्तांच्या विशेष पथकाने ३० नोव्हेंबर २०२२ रोजी सकाळी अर्जुननगर येथे अवैधरीत्या वाळूची वाहतूक करणारा ट्रक पकडण्याचा प्रयत्न केला होता. यावेळी चालकाने ट्रक न थांबविता विशेष पथकातील सहाय्यक पोलीस निरीक्षक योगेश इंगळे यांना दूर फरफटत नेले होते. त्यानंतर ट्रक थांबवून कारवाई सुरू असताना तेथे पोहोचलेल्या एहफाज अहेमद याने योगेश इंगळे व कर्मचाऱ्यांसह महसूल विभागाच्या अधिकाऱ्यांशी हुज्जत घालून अडथळा निर्माण केला होता. या प्रकरणात अहफाज अहमदसह तिघांविरुद्ध गाडगेनगर पोलिसांत प्राणघातक हल्ला व सरकारी कामात अडथळा निर्माण केल्याप्रकरणी गुन्हा दाखल केला होता. त्यावेळी दोघांना अटक करण्यात आली होती.

तलवारी, कोयत्यानंतर मिळाली रोकड

घटनेपासून अहफाज अहमद हा फरार आहे. काही दिवसांपुर्वी पोलिसांनी अहफाज अहमदच्या घराची झडती घेतली होती. यावेळी त्याच्या घरून ७ तलवारी व १ कोयता जप्त करण्यात आला होता. दरम्यान, गुरुवारी मध्यरात्री तो घरी आल्याची माहिती पोलिसांना मिळाली. या माहितीच्या आधारावर गाडगेनगर व नागपुरी गेट पोलिसांच्या संयुक्त पथकाने पुन्हा त्याच्या घराची झडती घेतली. यावेळी तो मिळून आला नाही. परंतु, त्याच्या घरी १३ लाख ४० हजार ४०० रुपयांची बेहिशोबी रोकड आढळून आली. पोलिसांनी ती रोकड जप्त केली. सहायक पोलीस आयुक्त पुनम पाटील यांच्या नेतृत्वात गाडगेनगरचे ठाणेदार आसाराम चोरमले व ‘टीम नागपुरी गेटने ही कारवाई केली.

आयकर विभागाला पत्र देणार

अहफाज अहमदचे उत्पन्नाचे स्त्रोत काय, ते आयकर भरतो की कसे, भरत असेल, तर ते तो कुठून मिळवितो, अशा प्रश्नांची उत्तरे मिळविण्यासाठी पोलीस आयकर विभागाला पत्र देणार आहे. त्याच्या घरातून जप्त केलेली रोकड वैध की बेहिशोबी हे शोधण्यासाठी हा पत्रव्यवहार केला जाणार आहे.

Web Title: 13.50 lakh seized from the house of absconding accused in the crime of assault

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.