अवकाळीने बाधित १३७० हेक्टरला नव्या निकषाने मिळणार शासनमदत
By गजानन उत्तमराव मोहोड | Published: March 28, 2023 06:24 PM2023-03-28T18:24:04+5:302023-03-28T18:24:17+5:30
अवकाळीने बाधित १३७० हेक्टरला नव्या निकषाने शासनाकडून मदत मिळणार आहे.
अमरावती : जिल्ह्यात अवकाळी पाऊस व गारपिटीने साडेतीन हजार हेक्टरमधील रब्बी व फळपिकांचे नुकसान झालेले आहे. या बाधित क्षेत्राचे पंचनामे पूर्ण झाले आहेत. त्यानुसार ३३ टक्क्यांवर नुकसान झालेल्या २,६६३ शेतकऱ्यांना १,३६९ हेक्टर क्षेत्रासाठी नव्या वाढीव निकषानुसार शासन मदत मिळणार आहे, यासाठी निधी मागणीचा प्रस्ताव जिल्हा प्रशासनाने पाठविला आहे. १६ ते १९ मार्चदरम्यान अवकाळी पाऊस व गारपिटीने आठ तालुक्यातील १६४ गावांमधील ३,४०९ हेक्टर क्षेत्रातील गहू, हरभरा, कांदा व संत्रा पिकाचे मोठे नुकसान झाले होते.
या बाधित क्षेत्राची महसूल विभागाच्या क्षेत्रीय यंत्रणेमार्फत पंचनामे करण्यात आले. यामध्ये १,३६९ हेक्टरमधील पिकांचे ३३ टक्क्यांवर नुकसान झाल्याचा अहवाल आहे. या बाधित क्षेत्राला आता २७ मार्चला जाहीर एनडीआरएफच्या नव्या निकषाने मदत मिळणार आहे. यासाठी जिल्हाधिकारी पवनीत कौर यांनी विभागीय आयुक्तांमार्फत शासनाकडे निधीची मागणी केल्याची माहिती आहे. नव्या निकषानुसार दोन हेक्टर क्षेत्र धारणा करणाऱ्या शेतकऱ्यांना मदत मिळणार आहे. यामध्ये रब्बीच्या जिरायती पिकांसाठी ८७०० रुपये हेक्टर, बागायती पिकांना १७ हजार रुपये हेक्टर व फळपिकांना २२,५०० रुपये हेक्टर या प्रमाणे शासन मदत देत राहणार आहे.