१४ गाई, चार बकऱ्यांचा तलावात बुडून मृत्यू
By admin | Published: May 30, 2017 12:16 AM2017-05-30T00:16:56+5:302017-05-30T00:16:56+5:30
नजीकच्या सावंगा येथील जंगलात चराईसाठी गेलेल्या १४ गाई, चार बकऱ्यांचा रविवारी सायंकाळी वादळी पावसात अडकल्याने मृत्यू झाला.
सावंगा येथील घटना : वादळी पावसाचा तडाखा
लोकमत न्यूज नेटवर्क
वरूड/लोणी : नजीकच्या सावंगा येथील जंगलात चराईसाठी गेलेल्या १४ गाई, चार बकऱ्यांचा रविवारी सायंकाळी वादळी पावसात अडकल्याने मृत्यू झाला. ही घटना रविवारी सायंकाळी सावंगा येथे घडली.
चराईनंतर ही जनावरे परत येत होत्या. याचवेळी काल सायंकाळी साडेपाच वाजतादरम्यान महादेवखोरी प्रकल्पावर पाणी पिण्यास गेल्या, तेव्हा वादळी पाऊस आल्याने जनावरे सैरभैर झाली. सर्व जनावरे हवेच्या प्रवाहाने सरळ तलावातील पाण्यात शिरली. यातील १४ गायी, ४ बकऱ्यांचा पाण्यात बुडून मृत्यू झाला, तर उर्वरित जनावरांना मच्छीमारांनी वाचविले.
प्राप्त माहितीनुसार, वरूड तालुक्यातील सावंगा येथील गुराखीने जंगलात जनावरे चराईकरिता नेले होते. २८ मे रोजी सायंकाळी ५.३० वाजतादरम्यान परतीच्या वेळी ४० ते ४५ गाई, बकऱ्या पाणी पिण्याकरिता प्रकल्पात गेल्या.
तलावातील पाण्यात शिरल्याने यातील १४ गायी, ४ बकऱ्या पाण्यात बुडून मृत्यूमुखी पडल्या, तर येथे उपस्थित शरद उपसा योजनेचा कर्मचारी राऊत आणि मच्छीमारांनी तलावात बोटी टाकून १५ ते २० जनावरे वाचविण्यात यश मिळविले. या घटनेत अंदाजे तीन लाख रुपयाचे नुकसान झाले आहे. तहसीलदार आशिष बिजवल यांना माहिती मिळताच तहसीलदार बिजवल, तलाठी खरात, नायब तहसीलदार देशमुख, सहारे यांच्यासह आपत्ती निवारण समितीचे पथक घटनास्थळावर पोहोचले, तर सोमवारी पशुवैद्यकीय अधिकारी सावरकर यांनी मृत जनावरांचा पंचनामा व शवविच्छेदन करून अहवाल तयार करुन महसूल विभागाला सादर केला आहे.