महामार्गावर १४ लाखांची अवैध देशी दारू पकडली
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: May 19, 2017 12:37 AM2017-05-19T00:37:36+5:302017-05-19T00:37:36+5:30
अवैधरीत्या ५९५ देशी दारुचे बॉक्स घेऊन जाणारा ट्रक लोणी पोलिसांनी महामार्गावर पकडला.
५९५ बॉक्स जप्त : लोणी पोलिसांची कारवाई
लोकमत न्यूज नेटवर्क
बडनेरा : अवैधरीत्या ५९५ देशी दारुचे बॉक्स घेऊन जाणारा ट्रक लोणी पोलिसांनी महामार्गावर पकडला. यात १४ लाख रुपयांची दारू मोर्शी येथे जात होती. ही कारवाई बुधवार १७ मे रोजी उशिरा रात्री केली. नाकाबंदीत हा ट्रक पकडण्यात आला.
दिगांबर शिवदास बर्वेकर (६२, रा. चिखली, जि.बुलडाणा), कृष्णा छगन बहिरागी (३०, निमाड, म.प्र.), इरफान वल्द जाकीर (२९, बालसमर, म.प्र.), गालगोर चंद्रगोर (५७, रा. रामनगर, जालना) अशी आरोपींची नावे आहेत.
बुधवार १७ रोजी सायंकाळी ७ वाजता महामार्गावरील वाटपूर फाट्यानजिक नाकाबंदीत लोणी पोलिसांनी एमएच १८ एम ५७६२ क्रमांकाच्या ट्रकला थांबविले व त्याची तपासणी करण्यात आली. पोलिसांना त्यात देशी दारूचे बॉक्स आढळून आले. ट्रक पोलीस ठाण्यात लावण्यात आला. उशीरा रात्रीपर्यंत कारवाई सुरू होती. त्यात ५९५ देशी दारुचे बॉक्स आढळून आलेत एकूण १३ लाख ८७ हजारांची दारू जप्त करण्यात आली. लोणीचे सहायक पोलीस निरीक्षक ए.एन.चेतरकर, गजानन डवरे, शालीग्राम गवई, प्रकाश किल्लेदार, श्रीकांत बेले, राजेंद्र ताथोडे, नागरभोजे आदी पोलीस कर्मचारी कारवाईत सहभागी होते. पकडलेला देशी दारूचा माल अकोल्याहून मोर्शी येथे जात असल्याचे पोलिसांना समजते. ट्रकसह चारही आरोपींना ताब्यात घेण्यात आले. त्यांच्यावर कलम ६५ (ई) मुंबई प्रो.अॅक्टनुसार कारवाई करण्यात आली. अवैधरीत्या देशी दारू वाहून नेणाऱ्या ट्रकला पकडून लोणी पोलिसांची ग्रामीण भागातील ही मोठी कारवाई आहे. अमरावती शहराकडे वाहनांनी मोठ्या प्रमाणात अवैध दारू येत असल्याचे झालेल्या कारवाईवरून समोर येत आहे. नाकाबंदी चोख ठेवल्यास बऱ्यापैकी अवैध दारू पोलिसांना पकडता येऊ शकते.