पोलीस ठाण्यात तक्रार देतो म्हणून उकळले १४ लाख रुपये, महिलेसह दोघांविरूध्द खंडणीचा गुन्हा
By प्रदीप भाकरे | Published: October 6, 2023 06:55 PM2023-10-06T18:55:38+5:302023-10-06T18:55:49+5:30
स्टॅंप पेपर फाडला, २ लाख रुपये लांबविले
अमरावती: पोलीस ठाण्यात तक्रार देण्याची धमकी देऊन येथील एका व्यक्तीकडून १२.६० लाख रुपये उकळण्यात आले. ती महिला तेवढ्यावरच न थांबता ती त्याच्याकडील २ लाख ९ हजार ५०० रुपये रोख, आधार व पॅनकार्ड घेऊन पोबारा झाली. ४ ऑक्टोबरपुर्वी राजापेठ पोलीस ठाण्याच्या हददीत हा प्रकार घडला. याप्रकरणी, राजापेठ पोलिसांनी ओंकार नामक फिर्यादीच्या तक्रारीवरून ५ ऑक्टोबर रोजी एक महिला व तिच्या नातेवाईकाविरूध्द खंडणी, मारहाण, धमकीचा गुन्हा दाखल केला.
तक्रारीनुसार, फिर्यादी ओंकार नामक व्यक्तीची आरोपी महिलेसोबत एक वर्षापुर्वी ओळख झाली होती. त्यानंतर आरोपी व फिर्यादी हे एकमेकांना भेटत होते. ती फिर्यादी यांच्या कार्यालयात येत होती. आरोपी महिलेने वेळोवेळी फिर्यादी ओंकार यांना पैशाची मागणी केली. दिले नाही तर पोलीस स्टेशनला जावुन तक्रार देतो, अशी धमकी दिली. त्यामुळे तिने यापुर्वी त्यांच्याकडून पाच लाख रूपये तसेच वेळोवेळी एकुण १२ लाख ६० हजार रूपये उकळले. दरम्यान ४ ऑक्टोबरपुर्वी आरोपी महिलेने ओंकार यांना पुन्हा दोन लाख रूपयांची मागणी केली होती. नाहीतर पोलीस स्टेशनला जावुन तक्रार देतो, अशी धमकी दिली.
स्टॅम्प पेपर फाडला
दरम्यान, फिर्यादीला तो ससेमिरा कायमचा टाळायचा होता. त्यामुळे दोन लाख रुपये घे व स्टॅम्पवर सही करून दे, यानंतर मला ब्लॅकमेलिंग करू नको. असे ओंकार यांनी तिला बजावले. दरम्यान ४ ऑक्टोबरपुर्वी ओंकार हे २ लाख रुपये व स्टॅम्पपेपर घेऊन राजापेठ पोलीस ठाण्याच्या हद्दीतील एका ठिकाणी गेले. त्यावेळी महिला आरोपीने स्टॅम्प पेपर फाडला. तसेच ओंकार यांच्या दुचाकीच्या डिक्कीतील दोन लाख रूपये, ९५०० रुपये रोख असलेले वॉलेट, एटीएम कार्ड, पॅन कार्ड, आधार कार्ड, असे महत्वाचे कागदपत्र घेऊन ती रफुचक्कर झाली.