बँकेची १४ लाखांनी फसवणूक
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: June 11, 2016 11:59 PM2016-06-11T23:59:47+5:302016-06-11T23:59:47+5:30
बनावट खरेदीपत्राने येथील आंध्रा बँकेची सुमारे १४ लाखांनी फसवणूक करण्यात आली.
अमरावती : बनावट खरेदीपत्राने येथील आंध्रा बँकेची सुमारे १४ लाखांनी फसवणूक करण्यात आली. ९ डिसेंबर २०१४ रोजी हा प्रकार घडल्याचे तक्रार बँकेमार्फत शुक्रवारी शहर कोतवाली ठाण्यात करण्यात आली आहे. विशाल अशोक मोहोड (रा.पटवीपुरा), संजय केदारनाथ सराफ (मुधोळकर पेठ) आणि गजानन वसंत कुळकर्णी (रा. पटवीपुरा) या तिघांचा आरोपींमध्ये समावेश आहे. त्यांचेविरुध्द पोलीस ठाण्यात भादंविच्या कलम ४२०, ४६७,४६८ अन्वये गुन्हा नोंदविण्यात आला आहे. याप्रकरणातील गजानन कुळकर्णी हा मुख्य आरोपी असून त्याने यापूर्वीही बँकेत बनावट दस्तऐवज ठेवून बँकेची कोट्यवधींची फसवणूक केली आहे. आरोपी कर्जदार विशाल मोहोड याने बनावट खरेदीपत्र व शपथपत्र तयार केले, तर संजय सराफ व गजानन कुळकर्णी यांनी ते खरेदीपत्र बँकेजवळ जमानतीवर गहाण ठेवले आहे.
खरेदीसाठी घेतले कर्ज
अमरावती : प्लॉट खरेदीकरिता १४ लाखांचे कर्ज घेतले. मात्र, त्यानंतर चुकीच्या पद्धतीने त्या रकमेचा गैरवापर केला. याबाबत आंध्रा बँकेचे शाखा व्यवस्थापक पी.फणी लक्ष्मीकांत यांच्या तक्रारीवरून शहर कोतवाली पोलिसांनी गुन्हे नोंदविले आहे. या प्रकरणाचा तपास सहायक पोलीस निरीक्षक सुमित परतेकी यांच्याकडे सोपविण्यात आला आहे. यापूर्वीही याच प्रकरणातील आरोपीविरुद्ध तब्बल पाच कोटी रुपयांनी बँकेची फसवणूक केल्याचा प्रकार उघड झाला आहे. बनावट खरेदीखत करून या तोतयांनी अनेक बँकांना गंडा घातल्याचा संशय व्यक्त होत आहे. ( प्रतिनिधी)