नियमित तपासणीसाठी १४ जलद प्रतिसाद पथके
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: January 13, 2021 04:29 AM2021-01-13T04:29:19+5:302021-01-13T04:29:19+5:30
अमरावती : जिल्ह्यात कुठेही बर्ड फ्लूसदृश परिस्थिती आढळलेली नसली तरीही पूर्वदक्षता व प्रतिबंधात्मक उपाययोजना वेळीच करणे आवश्यक ...
अमरावती : जिल्ह्यात कुठेही बर्ड फ्लूसदृश परिस्थिती आढळलेली नसली तरीही पूर्वदक्षता व प्रतिबंधात्मक उपाययोजना वेळीच करणे आवश्यक आहे. त्यामुळे जिल्हा प्रशासनाने तात्काळ कार्यवाही करण्याचे निर्देश पालकमंत्री यशोमती ठाकूर यांनी सोमवारी दिले. त्यानुसार पशुसंवर्धन विभागाकडून जिल्ह्यात १४ तालुकास्तरीय रॅपिड रिस्पॉन्स टीम निर्माण करण्यात येऊन नियमित तपासणीच्या सूचना देण्यात आल्या आहेत.
दरम्यान, ना. ठाकूर यांच्या निर्देशानुसार जिल्हाधिकारी कार्यालयात जिल्हा झोनोटिक डिसीज नियंत्रण समितीची बैठक घेण्यात आली. अप्पर जिल्हाधिकारी रामदास सिद्धभट्टी अध्यक्षस्थानी होते. निवासी उपजिल्हाधिकारी नितीन व्यवहारे, जिल्हा पशुसंवर्धन उपायुक्त मोहन गोहत्रे, डॉ. राधेश्याम बहादुरे, जिल्हा पशुसंवर्धन अधिकारी विजय रहाटे, सहायक पशुचिकित्सा आयुक्त एस.एम. कावरे, अतिरिक्त जिल्हा शल्यचिकित्सक प्रमोद निरवणे, महापालिकेचे पशुवैद्यकीय अधिकारी सचिन बोंद्रे, पी.टी. आकोडे, एस.जी. जिरापुरे, तपन कोल्हे आदी उपस्थित होते.
तालुकास्तरीय पथकांनी पोल्ट्री फार्म, कुक्कुटपालक यांच्याकडे नियमित तपासणी करावी. जिल्ह्यात सुमारे पाच हजार क्षमतेचे ३५० ते ४०० पोल्ट्री फार्म आहेत. कोंबड्यांची अंदाजे संख्या १३ लाख आहे. या सर्व पोल्ट्री फार्म व कुक्कुटपालकांनाही सावधगिरीच्या सूचना देणे आवश्यक आहे. पक्ष्यांत कुठेही आजाराची लक्षणे आढळताच तात्काळ तपासणी, आवश्यक तिथे चाचणी, नमुने घेणे व आवश्यक माहिती मिळण्यासाठी पूर्णवेळ संपर्क कक्ष निर्माण करण्याचे निर्देश अप्पर जिल्हाधिकाऱ्यांनी दिले.
बॉक्स
मृत सहा पक्ष्यांचे नमुने तपासणीला
पक्ष्यांमध्ये अद्याप प्रादुर्भाव आढळला नाही. धारणी तालुक्यात दिया येथे तीन कावळे, एक घुबड व बडनेऱ्यात दोन पक्षी मृत झाल्याचे आढळले. त्यांच्या मृत्यूची कारणे जाणून घेण्यासाठी हे सहा पक्षी पुणे येथील राज्यस्तरीय रोग अन्वेषण प्रयोगशाळेकडे पाठविण्यात आल्याची माहिती पशुसंवर्धन उपायुक्त मोहन गोहत्रे यांनी दिली.
बॉक्स
जलाशयांवर देखरेख ठेवणार
स्थलांतरित पक्ष्यांच्या संचाराने प्रादुर्भाव होऊ शकतो. मुख्यत्वे हे पक्षी जलाशयांच्या ठिकाणी वावरत असतात. त्यामुळे जलाशये, तलाव आदी ठिकाणी अशा घटनांवर देखरेख ठेवण्याबाबत जलसंपदा विभागाला सुस्पष्ट निर्देश देण्यात यावेत. ही कार्यवाही महापालिकेच्या अंतर्गत जलाशयाबाबतही व्हावी. महापालिका स्तरावरील पथकांना नियमित तपासणीच्या सूचना द्याव्यात व जनजागृतीही करावी, असे निर्देश निवासी उपजिल्हाधिकारी यांनी दिले.
बॉक्स
सिमेपलिकडील पोल्ट्रीधारकांना सुचना
पोल्ट्री फार्मला सोडियम बायोकार्बोनेटने नियमित स्वच्छता करण्याचे आदेश दिले आहेत. पथकांच्या सुरक्षिततेसाठी त्यांना आवश्यक साधने देण्यात येत आहेत. बर्ड फ्लूसदृश स्थिती जिल्ह्यात अद्याप आढळली नाही. मात्र खबरदारी घेण्यात येत आहे. अमरावती जिल्हा सध्या तरी सुरक्षित आहे. राज्य सीमेपलीकडून येणाऱ्या पोल्ट्री वाहतूकदारांना सूचना देण्यात आली असल्याचे पशुसंवर्धन अधिकारी विजय रहाटे यांनी सांगितले.