धामणगावात १४ शाळांची घंटा बंदच
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: July 16, 2021 04:10 AM2021-07-16T04:10:33+5:302021-07-16T04:10:33+5:30
धामणगाव रेल्वे : तालुक्यातील १४ ग्रामपंचायतींनी शाळा सुरू करण्यास अद्यापही ठराव न दिल्याने या शाळांची घंटा वाजलीच ...
धामणगाव रेल्वे : तालुक्यातील १४ ग्रामपंचायतींनी शाळा सुरू करण्यास अद्यापही ठराव न दिल्याने या शाळांची घंटा वाजलीच नाही. केवळ तालुक्यातील दोन शाळांमध्ये पाच विद्यार्थ्यांनी हजेरी लावली. आठवी ते बारावीच्या बहुतांश विद्यार्थ्यांनीही पहिल्या दिवशी शाळेला पाठ दिली.
धामणगाव रेल्वे तालुक्यातील ग्रामीण भागात असलेल्या २३ शाळा- कनिष्ठ महाविद्यालयांच्या व्यवस्थापन समितीची बैठक बुधवारी घेण्यात आली. पाच ते सात दिवसांपूर्वी स्थानिक ग्रामपंचायतींना संबंधित गावातील शाळा सुरू करण्यासंदर्भातील ठराव मागितले होते. गावातील शाळा सुरू करण्याविषयी व्यवस्थापन समितीने ठरविले. काही पालकांनी होकार दिला असला तरी १४ ग्रामपंचायतींनी ठराव दिले नाहीत. त्यामुळे या शाळेची घंटा गुरुवारी वाजली नाही. ज्या नऊ ग्रामपंचायतींनी ठराव दिले, ते स्वतःच्या जबाबदारीवर आपण शाळा सुरू करण्यात यावे, असेही या ठरावात नमूद केले. त्यामुळे शाळा उघडायची कशी व या शाळा सुरू केल्यास विद्यार्थ्यांच्या आजाराची जबाबदारी स्वीकारावी कशी, असे प्रश्न अनेक शाळा व्यवस्थापन समितीपुढे उभे ठाकले.
दरम्यान, परवानगी दिलेल्या शाळांकडे विद्यार्थी फिरकले नाहीत. अनेक शाळांनी विद्यार्थ्यांच्या स्वागतासाठी आणलेले पुष्पगुच्छ घराकडे परत न्यावे लागले.
---------------
धामणगाव तालुक्यातील १४ गावांतील ग्रामपंचायतीने ठराव दिले नाही. त्यामुळे या शाळेची घंटा वाजली नाही.
- मुरलीधर राजनेकर, गटशिक्षणाधिकारी, पंचायत समिती, धामणगाव रेल्वे