१४ आत्महत्याग्रस्त शेतकरी कुटुंबांना मदत
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: August 27, 2017 10:05 PM2017-08-27T22:05:16+5:302017-08-27T22:05:37+5:30
अमरावती व यवतमाळ या दोन जिल्ह्यात शेतकरी आत्महत्येचे प्रमाण अधिक आहे.
लोकमत न्यूज नेटवर्क
अमरावती : अमरावती व यवतमाळ या दोन जिल्ह्यात शेतकरी आत्महत्येचे प्रमाण अधिक आहे. पूर्वीच्या काळात गाई-म्हशीच्या दूध उत्पादनातून शेतकरी कुटुंबातील महिला पैशांची बचत करीत होत्या. ऐन अडचणीच्या वेळेस हा बचत केलेला पैसा कामी येत असे. कालांतराने शिक्षणासाठी व रोजगाराच्या माध्यमातून आर्थिक स्थिती मजबूत करण्यासाठी लोक शहराकडे स्थलांतरित होऊ लागले. सततची नापिकी व निर्सगाचा लहरीपणा यामुळे शेतकरी आर्थिक विवंचनेत अडकला. सर्व अडचणींवर मात करण्यासाठी शेतकºयांनी पूर्वीप्रमाणेच शेतीपूरक व्यवसाय करून आत्मनिर्भर व्हावे, असे संवेदनशील आवाहन पालकमंत्री प्रवीण पोटे यांनी रविवारी केले.
महाराष्ट्र राज्य विद्युत कंपनी अभियंता सहकारी पतसंस्था मर्या. अमरावती या संस्थेची ३१ वी वार्षिक आमसभा पार पडली. त्याप्रसंगी ते बोलत होते. यावेळी या पतसंस्थेव्दारे जिल्ह्यातील १४ आत्महत्याग्रस्त शेतकºयांंच्या कुटुंबीयांना १० हजार रुपये मदतीचा धनादेश वितरीत करण्यात आले. याप्रसंगी संस्थेचे पदाधिकारी सुनील जगताप, महावितरण यवतमाळचे अधीक्षक अभियंता रामेश्वर माहुरे, महावितरण अमरावतीचे अधीक्षक अभियंता अनिल वाकोडे, महापारेषणचे अधीक्षक अभियंता प्रफुल्ल औघड, वाशिमचे अधीक्षक अभियंता कैशरीया, आम्ही सारे फॉउंडेशनचे शेतकरी नेते विजय विल्हेकर सर्व सदस्य उपस्थित होते.
राज्य शासनाकडून शेतकरी आत्महत्या रोखण्यासाठी विविध उपाययोजना राबविण्यात येत आहे. यावर्षी कर्जमाफी योजनेंतर्गत प्रत्येक शेतकºयाला १० हजारांची तातडीची मदत आणि दीड लाखांपर्यंतची कर्जमाफी देण्यात येत आहे. शेतकºयांनी खचून न जाता इतर शेतीपूरक व्यवसाय करून आर्थिक सुबत्ता प्राप्त करावी. शेतीपूरक व्यवसाय व जोडधंदा म्हणून गाई-म्हशीचे पालन करावे, असे ते म्हणाले.
महावितरणच्या अभियंतांनी आत्महत्याग्रस्त व गोर-गरीब कुंटुंबातील तीन विद्यार्थ्यांचा शिक्षणाचा खर्च भागवावा. होतकरु विद्यार्थ्यांना पुस्तकांचा संच व दोन गणवेशाचे जोड उपलब्ध करून दिल्यास आयुष्यात आपणसुध्दा समाजिक दायित्व पूर्ण केल्याची भावना निर्माण होईल, असे पोटे म्हणाले. समारंभात १० वी, १२ वी मध्ये प्राविण्य प्राप्त केलेल्या अभियंतांच्या पाल्यांचा व वरिष्ठ पदावर पदोन्नती मिळालेल्या अभियंतांचे तसेच सेवानिवृत्त अभियंतांचे मान्यवरांच्या हस्ते सत्कार करण्यात आला. प्रास्ताविकात राजेंद्र ठाकरे यांनी पतसंस्थेचा लेखाजोखा वाचून दाखविला. कार्यक्रमाचे संचालन उज्वल गावंडे यांनी केले, तर आभार मोघे यांनी मानले.