जूनपर्यंत १४१.२५ दलघमी साठा शिल्लक
By admin | Published: May 12, 2016 12:09 AM2016-05-12T00:09:25+5:302016-05-12T00:09:25+5:30
जिल्ह्यातील मुख्य व माध्यम अशा १० जल प्रकल्पांत जून २०१६ अखेरपर्यंत केवळ १४१.२५ दलघमी जलसाठा शिल्लक राहणार आहे.
धोक्याची घंटा : ४८.६१ दलघमी पाण्याचे बाष्पीभवन व्यय
अमरावती : जिल्ह्यातील मुख्य व माध्यम अशा १० जल प्रकल्पांत जून २०१६ अखेरपर्यंत केवळ १४१.२५ दलघमी जलसाठा शिल्लक राहणार आहे. यापैकी ४८.६१ दलघमी पाण्याचे बाष्पीभवन होणार आहे. पाणीपुरवठा योजनांसाठी २८.४३ व उन्हाळी हंगामासाठी १३.०७ दलघमी पाणी आवश्यक असल्याने मान्सूनने हुलकावणी दिल्यास जिल्ह्यात पाणी-टंचाईची स्थिती उद्भवणार आहे.
जिल्ह्यातील प्रमुख उर्ध्व वर्धा प्रकल्पात जलाशयातील पाण्याची नियोजनानूसार जूनअखेरपावेतो ८७.७५ दलघमी जलसाठा शिल्लक राहणार आहे. परंतु या साठ्यापैकी २९.८३ दलघमी पाण्याचे बाष्पीभवन व पाणीपुरवठा योजनांसाठी २०.३३ तसेच उन्हाळी हंगामाकरिता १० दलघमी पाण्याचा वापर होत असल्याने या प्रकल्पात जेमतेमच जलसाठा शिल्लक राहणार आहे. शहापूर मध्यम प्रकल्पात ४६.०४ दलघमी प्रकल्पीय साठ्याच्या तुलनेत जूनअखेरपावेतो केवळ १०.८१ दलघमी जलसाठा शिल्लक राहणार अहे. उपलब्ध साठ्यापैकी ५.५६ दलघमी साठ्याचे बाष्पीभवन होणार आहे. पाणीपुरवठा योजनांसाठी ४.८० दलघमी पाणी वापर होणार असल्याने प्रकल्प कोरडे पडण्याची शक्यता आहे.
सपन प्रकल्पात जून २०१६ अखेर १३.६६ दलघमी जलसठा शिल्लक राहणार आहे. यामध्ये ५.०६ दलघमी पाण्याचे बाष्पीभवन होईल. पूर्णा प्रकल्पात जूनअखेर ६.५७ दलघमी साठा शिल्लक राहणार आहे. यापैकी १.३८ दलघमी पाण्याचे बाष्पीभवन व पाणीपुरवठा योजनेला १.१५ दलघमी पाण्याचे बाष्पीभवन होणार आहे. चंद्रभागा मध्यम प्रकल्पात प्रकल्पीय साठा ४१.२५ दलघमी आहे. यापैकी जून अखेर पावेतो १३.६५ दलघमी साठा शिल्लक राहणार आहे. यामध्ये २०१५ दलघमी पाण्याचे बाष्पीभवन व १.३३ दलघमी पाण्याचा पाणी पुरवठा योजनासाठी वापर होणार असल्याने पावसाळ्यापूर्वी पाण्याची भीषण समस्या उद्भवणार आहे.
पावसाळ्यापूर्वी लघु प्रकल्पात ठणठणाट
४२ लघु प्रकल्पात प्रकल्पीय उपयुक्त साठ्याच्या तुलनेत जून अखेर पावेतो ४.२१ दलघमी जलसाठा शिल्लक राहणार आहे. यामध्ये २.८७ दलघमी पाण्याचे बाष्पीभवन ०.८८ दलघमी पाणी योजनासाठी वापरले जाणार असल्याने पावसाळ्यापूर्वीच हे प्रकल्प कोरडे पडण्याची शक्यता आहे.