हरितक्षेत्र विकासासाठी १.४७ कोटी
By Admin | Published: May 27, 2017 12:09 AM2017-05-27T00:09:31+5:302017-05-27T00:09:31+5:30
शिवटेकडी पाठोपाठ भीमटेकडी परिसरात हरितक्षेत्र विकास प्रकल्प राबविण्यास सरकारने हिरवी झेंडी दिली आहे. १.४७ कोटी रुपयांमधून हा भाग हिरवागार केला जाणार आहे.
भीमटेकडीवर वृक्ष आच्छादन : महापालिकाच कार्यान्वयन यंत्रणा
लोकमत न्यूज नेटवर्क
अमरावती : शिवटेकडी पाठोपाठ भीमटेकडी परिसरात हरितक्षेत्र विकास प्रकल्प राबविण्यास सरकारने हिरवी झेंडी दिली आहे. १.४७ कोटी रुपयांमधून हा भाग हिरवागार केला जाणार आहे. या प्रकल्पास नगरविकास विभागाने २४ मे रोजी प्रशासकीय मान्यता दिली. यापूर्वी शिवटेकडी परिसरात ९० लाख रुपयांच्या हरितक्षेत्र विकास प्रकल्पास राज्य शासनाने मान्यता दिली होती. सन २०१६-१७ या आर्थिक वर्षात भीमटेकडी परिसरातील वृक्ष आच्छादनाला मंजुरी मिळाली आहे.
केंद्र शासनाकडून मंजूर राज्य वार्षिक कृती आराखड्यानुसार अमरावती शहराच्या सन २०१६-१७ या वर्षाच्या हरित क्षेत्रविकास योजनेचा एकूण वित्तीय आकृतीबंध १.४७ कोटी असा आहे. अमरावती महापालिकेच्या कार्यकारी अभियंत्यांनी या प्रकल्पास तांत्रिक मान्यता दिली होती. याशिवाय राज्यस्तरीय तांत्रिक समितीने मान्यता दिल्यानंतर नगरविकास विभागाने १.४७ कोटींच्या या प्रकल्पास प्रशासकीय मान्यता दिली. १.४७ कोटींपैकी १.१६ कोटी रूपये वृक्षारोपण, वृक्ष आच्छादन, तर २९.९३ लाख रूपये सिव्हील वर्कवर खर्च करण्यात येतील. येत्या नोव्हेंबर-डिसेंबरपर्यंत हा प्रकल्प पालिकेला पूर्णत्वास न्यायचा आहे. या प्रकल्पात ५,५२४ वृक्ष लागवड केली जाईल. त्यावर ३७ लाख रूपये खर्च अपेक्षित आहे. याशिवाय ३.७५ लाख रूपये खर्च करून छोटे व मध्यम स्वरुपाचे ‘आॅनॅमेंटल ट्रीज’ लावले जातील. ४५० चौरस मीटर क्षेत्रात शु्रबेरी, ९०० चौ. मीटर क्षेत्रात ‘क्रीपर्स’, ४०० चौ. मीटरवर ग्राऊंड कव्हर्स तर ७०.१९ लाख रूपये हार्टीकल्चर आणि लॅन्डस्केप वर्कवर खर्च होतील. याशिवाय शौचालय, सेप्टिक टँक, सुरक्षा रक्षकाची खोली, चेनलिंक फेन्सिंग, सौर दिवे, डस्टबीन, सम्पवेल आणि ट्री- गार्डवर २९.९३ लाख रूपये खर्च अपेक्षित आहे.
२५ मे रोजी निविदा?
अमृत अभियानांतर्गत शहराच्या हरित क्षेत्रविकास प्रकल्पाची निविदा २५ मे रोजी प्रसिद्ध करण्याचे नगरविकासचे निर्देश आहेत. १७ जूनपर्यंत प्राप्त निविदा स्वीकृतीची सर्व कार्यवाही पूर्ण करणे, २३ जूनपर्यंत कार्यादेश, कार्यादेशाच्या ६ महिन्यांत काम पूर्ण करणे असे कामाचे टप्पे ठरवून दिले आहेत.
३६ लाख मनपाचा हिस्सा
अमरावती महापालिका हरित क्षेत्रविकास २०१६-१७ या योजनेची किंमत १.४७ कोटी आहे. ७३ लाख रूपये केंद्र शासन देईल, तर प्रत्येक ३६ लाख ७५ हजार रूपये महापालिका आणि राज्य सरकारला खर्च करावे लागतील.
महापालिका
कार्यान्वयन यंत्रणा
२०१६-१७ या आर्थिक वर्षातील हरित क्षेत्रविकास प्रकल्पासाठी महापालिकाच कार्यान्वयन यंत्रणा आहे. या प्रकल्पाची अंमलबजावणी नोव्हेंबर २०१७ पर्यंत करण्याची जबाबदारी महापालिकेला आहे.
अमृत अभियानांतर्गत शहराच्या हरित क्षेत्रविकास प्रकल्पास राज्य सरकारने प्रशासकीय मान्यता दिली आहे. या प्रकल्पाची अंमलबजावणी महापालिका करेल.
- हेमंत पवार,
आयुक्त, अमरावती महापालिका