अमरावतीमध्ये पुन्हा १५ संक्रमित, एकाचा मृत्यू
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: July 5, 2020 07:45 PM2020-07-05T19:45:19+5:302020-07-05T19:45:31+5:30
एकूण ६९५ : महापौरांचा अहवाल निगेटिव्ह
अमरावती : जिल्ह्यात रविवारी १५ अहवाल पॉझिटिव्ह प्राप्त झाल्याने कोरोनाग्रस्तांची संख्या आता ६९५ झालेली आहे. महापौर कार्यालयाचा शिपाई संक्रमित झाल्याने महापौर चेतन गावंडे यांचा स्वॅब तपासणीला पाठवून त्यांना क्वारंटाईन करण्यात आले होते. शनिवारी रात्री उशिरा त्यांचा स्वॅब निगेटिव्ह आला.
विद्यापीठाद्वारा दुपारी प्राप्त अहवालात बडनेरा जुनीवस्तीतील ६५ वर्षीय, माताखिडकी येथील ५० वर्षीय, तारखेडा येथील ६० वर्षीय पुरुष, छायानगरातील १५ वर्षीय युवक, पन्नालालनगरात ५८ वर्षीय पुरुष व ५३ वर्षीय महिला, संत अच्युत महाराज रुग्णालयात ३९ वर्षीय महिला, अशोक नगरात ५० वर्षीय, चवरेनगरात ४० वर्षीय साबनपुºयात २३ वर्षीय व प्रवीण नगरात ६० वर्षीय महिला तसेच ग्रामीणमध्ये धामणगाव रेल्वे येथे ४४ वर्षीय पुरुषाचा अहवाल पॉझिटिव्ह आलेला आहे. सायंकाळी प्राप्त अहवालात दरोगा प्लाट येथील ५७ वर्षीय व बजरंग टेकडी येथील ६० वर्षीय महिला तसेच शारदानगरात ३५ वर्षीय पुरुषाचा अहवाल पॉझिटिव्ह आलेला आहे. या व्यतिरिक्त शहर कोतवाली ठाण्यातील संक्रमित ५० वर्षीय महिला शिपायाचा उपचारादरम्यान मृत्यू झाल्याने संक्रमितांच्या मृत्यूची संख्या आता २७ वर पोहोचली आहे.