जिल्ह्यातील १५ डी.एड. कॉलेजेस बंद
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: December 15, 2020 04:30 AM2020-12-15T04:30:21+5:302020-12-15T04:30:21+5:30
अमरावती : गत काही वर्षांपासून शिक्षक भरती बंद असल्याने अनेक बेरोजगार तरुण, तरुणींनी शिक्षण पदविका अभ्यासक्रमास (डी.एड) प्रवेश घेण्यास ...
अमरावती : गत काही वर्षांपासून शिक्षक भरती बंद असल्याने अनेक बेरोजगार तरुण, तरुणींनी शिक्षण पदविका अभ्यासक्रमास (डी.एड) प्रवेश घेण्यास नकारघंटा दर्शविली. त्यामुळे जिल्ह्यात एकूण ३५ डी.एड. कॉलेजपैकी तब्बल १५ कॉलेजेस बंद झाली आहेत. एकेकाळी डी.एड. प्रवेशासाठी रांगा लागत होत्या. मात्र, आता येथील ‘डायट’चा परिसर निर्मनुष्य दिसून येत आहे.
जिल्ह्यात डी.एड. कॉलेजची निर्मिती १९७० पासून आहे. मात्र, १९९५ पासून डी.एड. कॉलेजमध्ये प्रवेशास गळती सुरू झाली. प्रवेशाअभावी १५ कॉलेज बंद करण्याची नामुष्की संस्थाचालकांवर ओढवली आहे. यात बहुतांश डी.एड. कॉलेज हे विनाअनुदानित असल्याची माहिती आहे. यात काही डी.एड. कॉलेजेस अनुदानित असली तरी अनुदान लाटण्यासाठी कागदाेपत्री सुरू असल्याचा देखावा करण्यात येत असल्याचे दिसून येते. हा प्रकार ग्रामीण भागात मोठ्या प्रमाणात असल्याची विश्वसनीय माहिती आहे. शासकीय कोट्यातूनही प्रवेश घेण्यासाठी डी.एड. कॉलेजमध्ये विद्यार्थी मिळत नाही. मराठी माध्यमांचे सर्वाधिक डी.एड. कॉलेज बंद झाले आहेत.
---------------------------
यंदा एक डी.एड. कॉलेज बंद करण्याबाबत प्रस्ताव आला आहे. हा प्रस्ताव पुढे एनटीसीकडे मान्यतेसाठी पाठविण्यात आला असून, त्यानंतरच कॉलेज बंदबाबत कार्यवाही केली जाईल,
- मिलिंद कुबडे, प्राचार्य, डायट, अमरावती
----------
हे डी.एड. कॉलेज झाले बंद
महाराष्ट्र डी.एड. काॅलेज (चांदूरबाजार), बाबासाहेब वर्हाडे, राष्ट्रमाता, नानीबाई व इंडो पब्लिक डी.एड. कॉलेज (अमरावती), लालासाहेब, शंकुतलाबाई व गणेशराव देशमुख डी.एड. कॉलेज (तिवसा), केशरबाई डी.एड. कॉलेज (अचलपूर), सुभाषचंद्र बोस व विठ्ठलवाडी डी.एड. कॉलेज (दर्यापूर), माणिकलाल सारडा डी.एड. कॉलेज (अंजनगाव सूर्जी), डीआयईसीपीडी, सैय्यद डी.एड. मातोश्री हिरूबाई जवंजाळ डी.एड. कॉलेज (अमरावती) व मेळघाट आदिवासी डीएड. कॉलेज असे एकुण १५ कॉले बंद करण्यात आले आहे.