गोंडवाडी सर्कलमध्ये दीड लाखांची रोख जप्त
By Admin | Published: February 18, 2017 12:06 AM2017-02-18T00:06:06+5:302017-02-18T00:06:06+5:30
स्थानिक गुन्हे अन्वेषण पथकाने शुक्रवारी दुपारी ३ वाजता गोंडवाडी सर्कलमधील धूळघाट रोड येथे एका कारमधून दीड लाख रूपये रोख जप्त करून ...
कारसह दोघे ताब्यात : ‘एलसीबी’ची कारवाई
धारणी : स्थानिक गुन्हे अन्वेषण पथकाने शुक्रवारी दुपारी ३ वाजता गोंडवाडी सर्कलमधील धूळघाट रोड येथे एका कारमधून दीड लाख रूपये रोख जप्त करून कारसह दोघांना ताब्यात घेतले. याकारवाईमुळे परिसरात खळबळ उडाली आहे. कारमधून काँग्रेस उमेदवाराचे प्रचार साहित्य मिळाल्याने ही रोख रक्कम मतदारांमध्ये वाटण्यासाठी तर नेली जात नव्हती ना, या चर्चेला परिसरात उत आला आहे.
धूळघाट रोड येथे गुन्हे अन्वेषण शाखेच्या पथकाने खापरखेडा मार्गावरून धूळघाटकडे येणारी कार क्र.एम.एच. २७ ए.सी. ३८८६ थांबवून तपासणी केली असता गाडीत एक लाख ४२ हजारांची रोख दिसून आली. याबाबत कारमधील दोघांना विचारणा केली असता ते समाधानकारक उत्तरे देऊ शकले नाहीत. त्यामुळे गाडीसह दोघांना पोलीस ठाण्यात आणून चौकशी सुरू करण्यात आली होती. ग्रामीण पोलीस अधीक्षक लखमी गौतम, गुन्हे शाखेचे प्रमुख अनिल लाड यांच्या मार्गदर्शनाखाली पीएसआय ए.जी.बोरकर, देवीदास शेंडे, प्रवीण देशमुख, प्रमोद खरचे, दीपक सोनाळेकर, दिनेश कनोजिया व चालक सईद शईद यांनी ही कार्यवाही केली.
वृत्तलिहेपर्यंत एलसीबीकडून धारणी पोलीस ठाण्यात कारवाई सुरू होती. या कारवाईमुळे इतर उमेदवारांमध्ये भीतीचे वातावरण निर्माण झाले असून दुसरीकडे स्थानिक पोलीस प्रशासनाची निष्क्रियता उघड झाली आहे. त्यांच्या कार्यक्षमतेवर प्रश्नचिन्ह लागले आहे. (तालुका प्रतिनिधी)