मानवाधिकार आयोगाच्या नावाने १५ लाखांनी गंडवले; तोतया पदाधिकाऱ्यांना अटक
By प्रदीप भाकरे | Published: August 5, 2024 03:06 PM2024-08-05T15:06:10+5:302024-08-05T15:08:59+5:30
Amravati : भामट्यांपासून सजग राहण्याचे आवाहन
प्रदीप भाकरे
अमरावती: दिल्लीस्थित आंतराष्ट्रीय मानव अधिकार परिषदेचे पदाधिकारी असल्याची बतावणी करून चांदूररेल्वे येथील संजय ननोरे यांची तब्बल १५ लाख रुपयांनी फसवणूक करण्यात आली. याप्रकरणी तोतया पदाधिकारी अनिल बन्सीलाल राठोड (रा. चांदुर रेल्वे) व संदीप दादाराव राठोड (रा. पोहरा बंदी) यांना अटक करण्यात आली आहे.
संजय ऊर्फ बाळकृष्ण ननोरे यांची चांदूर रेल्वे हद्दीतील तुळजापुर शिवारात शेती आहे. त्यांच्या जमिनीवर आवादा कंपनीने सोलर प्रोजक्ट लावले असून, त्याचा मोबदला कंपनीकडून मिळणे बाकी होते. मोबदल्यावरून ननोरे व कंपनीत काही वाद सुरू होता. त्या दरम्यान ननोरे यांची आरोपी अनिल राठोड व संदीप राठोड यांच्याशी भेट झाली. त्यांनी स्वत:ची ओळख आंतरराष्ट्रिय मानव अधिकार परिषद, दिल्लीचे पदाधिकारी असल्याचे करुन दिली. कंपनीसोबत लढणे ननोरे यांना व्यक्तीश: शक्य होणार नाही, अशी खोटी बतावणी करून त्याकरिता त्यांचे शेत राहुल महाजन नावाच्या व्यक्तीस ७ लाख रुपयांमध्ये विक्री करण्यास भाग पाडले.
दरम्यान, कंपनीकडून तक्रारदार ननोरे यांच्या बँक खात्यात जमिनीच्या मोबदल्यापोटी २२ लाख रुपये आले असता अनिल राठोड व संदीप राठोड यांनी कंपनीकडून एकुण ३३ लाख रुपये मिळवून देतो, त्याकरिता आंतरराष्ट्रीय मानव अधिकार परिषद, दिल्लीच्या अध्यक्षांना पैसे पाठवावे लागतात, अशी खोटी बतावणी करून ननोरे यांच्याकडून १५ लाख रुपये घेऊन फसवणूक केली. आरोपींविरुध्द चांदुर रेल्वे येथे फसवणुकीचा गुन्हा नोंद करण्यात आला.
असे आहे पोलिसांचे आवाहन
आंतरराष्ट्रीय मानवाधिकार, राष्ट्रीय मानवाधिकार, राज्य मानवाधिकार आयोग यांचे नाव, बोधचिन्ह, खोटे ओळखपत्र, लेटरहेड याबाबींशी साधर्म्य ठेऊन काही उसम नागरिकांची फसवणूक करित असल्याचे या प्रकरणावरुन दिसून आले आहे. सबब, नागरिकांनी अशांवर विश्वास न ठेवता खोटी बतावणी करून धमकावणे किंवा एखादे प्रकरण मिटविण्याचे नावाखाली खंडणी घेण्याचा प्रकार करीत असल्यास तसेच केला असल्यास संबंधित पोलीस स्टेशनला तक्रार नोंदविण्याचे आवाहन स्थानिक गुन्हे शाखा प्रमुख किरण वानखडे यांनी केले आहे.