५० दिवसांत १५२ कोरोनाग्रस्त
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: May 24, 2020 05:00 AM2020-05-24T05:00:00+5:302020-05-24T05:01:12+5:30
संत गाडगेबाबा अमरावती विद्यापीठद्वारे शनिवारी दुपारी प्राप्त अहवालानुसार, हॉटस्पॉट बनलेल्या मसानगंज कंटेनमेंटमध्ये पुन्हा ७५ वर्षीय वृद्ध व्यक्ती संक्रमित आढळून आला. या भागात २२ कोरोनाग्रस्तांची नोंद झाली आहे. लगतच्या बजरंग टेकडी भागात १७ वर्षीय युवक व रतनगंजमध्ये ५२ वर्षीय व्यक्तीचा अहवाल पॉझिटिव्ह आला.
लोकमत न्यूज नेटवर्क
अमरावती : कोरोनाचा रोज नव्या भागात शिरकाव होत आहे. शनिवारी सात संक्रमितांची नोंद झाली. शहरात ३ एप्रिलला हाथीपुऱ्यात कोरोनाच्या पहिल्या रुग्णाची नोंद झाली. त्यानंतरच्या ५० दिवसांत संक्रमितांची संख्या १५२ झालेली आहे. अकोला येथील कम्युनिटी हेल्थ ऑफिसर येथील कोविड रुग्णालयात कर्तव्यावर आहे. शनिवारी त्यांचा अहवाल पॉझिटिव्ह आला.
संत गाडगेबाबा अमरावती विद्यापीठद्वारे शनिवारी दुपारी प्राप्त अहवालानुसार, हॉटस्पॉट बनलेल्या मसानगंज कंटेनमेंटमध्ये पुन्हा ७५ वर्षीय वृद्ध व्यक्ती संक्रमित आढळून आला. या भागात २२ कोरोनाग्रस्तांची नोंद झाली आहे. लगतच्या बजरंग टेकडी भागात १७ वर्षीय युवक व रतनगंजमध्ये ५२ वर्षीय व्यक्तीचा अहवाल पॉझिटिव्ह आला. हजरत बिलालनगर येथे ५२ वर्षीय पुरुष व खुर्शीदपुरा येथे ४२ वर्षीय व्यक्ती तसेच येथील कोविड रुग्णालयात कर्तव्यावर असलेल्या अकोल्यातील २८ वर्षीय युवकाच्या घशातील स्रावाचा अहवाल पॉझिटिव्ह आला. १५२ कोरोनाग्रस्तांपैकी १५ व्यक्ती दगावल्या. ७५ कोरोनामुक्त झाल्या आणि ६२ रुग्णांवर कोविड रुग्णालयात उपचार होत आहेत.
लॉकडाऊनच्या शिथिलतेनंतर सहा हजार नागरिकांची तपासणी करण्यात आली. यामध्ये आढळलेल्या सर्दी, ताप व खोकल्याच्या रुग्णांवर आरोग्य पथकाचा वॉच असल्याचे जिल्हाधिकारी म्हणाले. संशयितांची स्वॅब तपासणी लवकर व्हावी, यासाठी जिल्ह्यात प्राप्त झालेली एक ‘ट्रूनॉट’ मशीन येथील डॉ. पंजाबराव देशमुख स्मृती रुग्णालयात बसविण्यात आलेली आहे. याद्वारे तेथे स्वॅब कलेक्शन केले जात आहे. याठिकाणी नमुना निगेटिव्ह आल्यास पुन्हा तपासणीची गरज नाही. मात्र, पॉझिटिव्ह आल्यास त्या नमुन्याची विषाणू परीक्षण प्रयोगशाळेत तपासणी केली जात असल्याचे जिल्हाधिकाऱ्यांनी सांगितले.
दहावा कोरोना वॉरिअर संक्रमित
अकोला येथील अनंतनगरातील २८ वर्षीय कम्युनिटी हेल्थ आॅफिसर हे येथील कोविड रुग्णालयात सेवा देत आहेत. दहा दिवस कर्तव्यावर राहिल्यानंतर हेल्थ वॉरिअरना क्वारंटाइन करण्यात येते. त्यापूर्वी त्यांचे थ्रोट स्वॅब तपासणीला पाठविण्यात येतात. त्यामध्ये अहवाल पॉझिटिव्ह आल्याने सदर व्यक्तीला कोविड रुग्णालयातील दुसऱ्या माळ्यावरील कक्षात दाखल करण्यात आले. यापूर्वी याच रुग्णालयातील दोन सफाई कर्मचारी तसेच प्रत्येकी दोन पोलीस कर्मचारी, खासगी डॉक्टर व एसआरपीएफचे जवान संक्रमित झाले होते.
कोविडमध्ये संक्रमित महिलेचा मृत्यू
येथील अलहिलाल कॉलनीतील ५६ वर्षीय संक्रमित महिलेचा शुक्रवारी रात्री उशिरा येथील कोविड रुग्णालयात मृत्यू झाल्याने मृतांची संख्या १५ झालेली आहे. या महिलेला दोन दिवसांपूर्वी कोविड रुग्णालयात दाखल करण्यात आले होते. जिल्ह्यात कोरोनाबाधितांचा मृत्युदर हा इतर जिल्ह्यांच्या तुलनेत जास्त असा १० टक्के आहे. यापैकी सात होम डेथ आहेत. मृत्यूपश्चात त्यांच्या स्वॅबचा अहवाल पॉझिटिव्ह आलेला आहे. आरोग्य यंत्रणाद्वारे आता होम डेथ व्यक्तींचा स्वॅब न घेता, त्यांच्या कुटुंबातील व्यक्तींचे स्वॅब घेण्यात येत आहेत.