१५२ मोबाईल टॉवर्सच्या लहरींचा अभ्यास होणार
By admin | Published: April 5, 2015 12:19 AM2015-04-05T00:19:20+5:302015-04-05T00:19:20+5:30
मोबाईल लहरींचा माणसाच्या आरोग्यावर परिणाम होत असल्याचा दावा काही अभ्यासक करतात,..
केंद्राचा निर्णय : पुणे येथील आधारकर संशोधन संस्थेक डे जबाबदारी
अमरावती : मोबाईल लहरींचा माणसाच्या आरोग्यावर परिणाम होत असल्याचा दावा काही अभ्यासक करतात, तर काही अभ्यासक हा दावा चुकीचा असल्याचे सांगतात. या गोंधळात मानवी शरीरावर लहरींमुळे नेमका कोणता त्रास होतो की नाही हे सांगता येत नाही. यामुळे विज्ञान तंत्रज्ञान मंत्रालयाने मोबाईल टॉवर्सच्या लहरींचा अभ्यास करण्याचे ठरविले आहे. त्यानुसार अमरावती येथील १५२ मोबाईल टॉवर्समधून निघणाऱ्या लहरींचा अभ्यास करण्याची जबाबदारी पुणे येथील आधारकर संशोधन संस्थेकडे सोपविली आहे.
केंद्र शासनाच्या विज्ञान व तंत्रज्ञान मंत्रालयाने मोबाईल टॉवर्स लहरींचा अभ्यास करण्यासाठी देशभारतील १६ संस्थांची अभ्यासासाठी निवड केली आहे. त्याकरिता १० कोटींचे अनुदानसुद्धा मंजूर केले आहे. राज्यातील मोबाईल टॉवर्सच्या लहरींचा अभ्यास पुणे येथील आधारकर संशोधन संस्था करणार असून मानवी आरोग्यावर परिणामाचे नेमके चित्र काय राहील? हे अहवालात सांगितले जाणार आहे. या संस्थांना अभ्यासासाठी विषय देण्यात आले आहे. यामध्ये कर्करोग, मेंदूवर होणारे परिणाम, जैवरसायन अभ्यास, पुनरुत्पादन पद्धती यांच्यावर होणाऱ्या परिणामातील फरक, यावरील उपाय आदी विषयांचा समावेश असणार आहे.
२४ मोबाईल टॉवर्सना परवानगी
अमरावती शहरात उभारण्यात आलेल्या १५२ मोबाईल टॉवर्सपैकी केवळ २४ मोबाईल टॉवर्स कंपन्यांनी महापालिका प्रशासनाकडे आवश्यक ती कागदपत्रे सादर करुन परवानगी घेतली आहे. उर्वरित १२८ मोबाईल टॉवर्स कंपन्यांनी बिनदिक्कतपणे टॉवर्स उभारुन व्यवसाय करण्याची शक्कल लढविली आहे. या प्रकारामुळे महापालिकेला लाखो रुपयांच्या उत्पन्नापासून वंचित राहावे लागले आहे.
मोबाईल टॉवर्समधून निघणाऱ्या लहरींचा अभ्यास केला जाणार असल्याबाबतचा शासन निर्णय प्राप्त झाला नाही. त्याअनुषंगाने काही निर्णय आल्यास तशी कार्यवाही केली जाईल. अनधिकृत मोबाईल टॉवर्सना अधिकृत करुन घेण्याची कारवाई केली जाणार असल्याचे संकेत आहेत.
- सुरेंद्र कांबळे, एडीटीपी, महापालिका.