१६ कर्मचारी निलंबित, एक बडतर्फ
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: June 22, 2018 01:20 AM2018-06-22T01:20:05+5:302018-06-22T01:20:05+5:30
लोकमत न्यूज नेटवर्क
अमरावती : एसटी महामंडळाने ८ व ९ जून रोजी संपात सहभागी असणाऱ्या जिल्ह्यातील १६ कर्मचाऱ्यांना निलंबित केले आहे, तर एका कर्मचाऱ्याला बडतर्फ करण्यात आले आहे.
एसटी कर्मचाऱ्यांनी विविध मागण्यांसाठी दोनदिवसीय संप पुकारला होता. त्यामुळे जिल्ह्यासह राज्यातील प्रवाशांची जीवनवाहिनी असलेल्या एसटीची सेवा खंडित झाली. विविध मागण्यांसाठी एसटी कर्मचारी संघटनांनी पुकारलेल्या संपात कर्मचाऱ्यांनी सहभाग घेतला. संपकाळात जिल्ह्यासह शहरात कार्यरत असलेल्या विविध आगारांतील कर्मचाऱ्यांची संख्या बरीच होती. त्यामुळे एसटी वाहतूक पूर्णत: कोलमडली. परिणामी मध्यवर्ती बसस्थानकासह अन्य आगारातील दैनंदिन २ हजार ८० फेऱ्या रद्द करण्यात आल्या होत्या. संपाचा फटका नागरिकांना बसला. काही जण संपकाळात जेथे होते तेथे अडकून पडले होते.
दरम्यान, संपकाळात सहभागी चालक-वाहक, सहायक अशा एसटी महामंडळातील कर्मचाऱ्यांवर तात्काळ कारवाईच्या सूचना महामंडळाच्या वरिष्ठ अधिकाऱ्यांकडून संबंधित विभागांना देण्यात आल्या होत्या. हा आदेश प्राप्त होताच संपात सहभागी झालेल्या जिल्ह्यातील एकूण १७ कर्मचाऱ्यांवर कारवाई करण्यात आली. यामध्ये परतवाडा आगारातील १५, अमरावती येथील एक अशा १६ कर्मचाऱ्यांचे निलंबन, तर वरूड आगारातील एका कर्मचाऱ्याला बडतर्फ केल्याची माहिती सूत्रांनी ‘लोकमत’ला दिली.
संपकाळात ३५ लाखांचे नुकसान
एसटी कर्मचाऱ्यांनी पुकारलेल्या संपकाळात विभागातील बहुतांश एसटी बस उभ्या होत्या .२ हजार ८०० फेºया रद्द झाल्याने विभागाचे ३५ लाख रुपयांचे नुकसान झाले आहे.
एसटी महामंडळाच्या वरिष्ठ विभागाकडून प्राप्त आदेशानुसार ८ ते ९ जून दरम्यान संपात सहभागी असलेल्या कर्मचाऱ्यांचे निलंबन, तर एकाला बडतर्फ करण्यात आले आहे. प्रवाशांना वेठीस धरून संप पुकारल्याने ही कारवाई करण्यात आली आहे.
- श्रीकांत गभणे
विभाग नियंत्रक