१६ भरारी पथके रोखणार बियाण्यांचा काळाबाजार
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: May 17, 2021 04:11 AM2021-05-17T04:11:00+5:302021-05-17T04:11:00+5:30
अमरावती : आठ दिवसांपासून कमी-अधिक प्रमाणात मान्सूनपूर्व पावसाने हजेरी लावल्यानंतर जिल्ह्यात पेरणीपूर्व मशागतीला वेग आलेला आहे. अद्याप बियाणे बाजारात ...
अमरावती : आठ दिवसांपासून कमी-अधिक प्रमाणात मान्सूनपूर्व पावसाने हजेरी लावल्यानंतर जिल्ह्यात पेरणीपूर्व मशागतीला वेग आलेला आहे. अद्याप बियाणे बाजारात शुकशुकाट असला तरी बियाण्यांचा काळाबाजार होऊ नये, यासाठी कृषी विभागाद्वारा १६ भरारी पथकांचे गठन करण्यात आले आहे. याशिवाय ३१ संनियत्रण कक्षदेखील स्थापित करण्यात आलेला आहे.
येत्या २५ तारखेला रोहिणी नक्षत्राला सुरुवात होत आहे व सध्या वातावरण बदलामुळे २२ तारखेपर्यंत जिल्ह्यासह विभागात तुरळक ठिकाणी पावसाची शक्यता हवामान विभागाने व्यक्त केली आहे. रोहिनी नक्षत्रात जिल्ह्यात किमान पाच हजार हेक्टरमध्ये मान्सूनपूर्व पेरणी होण्याचा अंदाज आहे. १ जूनपर्यंत बीटी बियाण्यांच्या विक्रीला प्रतिबंध घातल्या गेला आहे. मात्र, पेरणीपूर्व मशागतीला वेग आलेला आहे. जिल्ह्यात कठोर संचारबंदी असलीतरी खरिपाच्या पार्श्वभूमीवर शेतीविषयक कुठल्याच कामांना आडकाठी नसल्याचे जिल्हा प्रशासनाने सांगितले.
पेरणीच्या काळात बियाण्यांचा तुटवडा, काळाबाजार होऊ नये याकरिता कृषी विभाग सरसावला आहे. यामध्ये विभाग व जिल्हास्तरावर प्रत्येकी एक व तालुकास्तरावर प्रत्येकी एक अशा १६ भरारी पथकांचे गठन करण्यात आले आहे. याशिवाय विभागस्तर एक, जिल्हास्तर दोन व तालुकास्तरावर प्रत्येकी दोन अशा ३१ संनियत्रण कक्षांची स्थापना केल्याची माहिती जिल्हा अधीक्षक कृषी अधिकारी विजय चवाळे यांनी दिली.
बॉक्स
अशी आहे भरारी पथकाची रचना
* जिल्हास्तरीय भरारी पथकाचे कृषी विकास अधिकारी पथकप्रमुख आहेत. याशिवाय संबंधित उपविभागीय कृषी अधिकारी मोहीम अधिकारी (जिप), निरीक्षक वजन-मापे हे सदस्य तर जिल्हा गुणनियंत्रण निरीक्षक हे पथकाचे सचिव आहेत.
* तालुकास्तरीय पथकाचे तालुका कृषी अधिकारी पथकप्रमुख, कृषी अधिकारी, निरीक्षक वजन-मापे, संबंधित कार्यक्षेत्राचे मंडळ अधिकारी सदस्य, पंचायत समितीचे कृषी अधिकारी (गुणवत्ता नियंत्रण निरीक्षक) पथकाचे सचिव आहेत.
बॉक्स
तक्रारीत नमूद निविष्ठांचे नमुने घेणार
कक्षाला प्राप्त तक्रारींच्या आधारे नमुद प्रत्येक निविष्ठांचे नमुने घेऊन ते तपासणीसाठी पाठविण्यात येणार आहे. याशिवाय तालुकानिहाय लक्षांक दिलेले आहेत. त्यानुसार नमुने घेणे बंधनकारक आहे. नमुने काढताना हलर्गजीपणा झाल्यास त्याचा प्रत्यक्ष, अप्रत्यक्ष लाभ विक्रेत्याला होत असल्याने नमुने घेताना काळजी घेण्याचे निर्देश कृषी आयुक्तालयाने दिले आहेत.
बॉक्स
तक्रार निवारण समिती
शेतकऱ्याच्या प्राप्त तक्रारीच्या अनुषंगाने चौकशीसाठी तक्रार निवारण समितीचे गठन करण्यात आलेले आहे. या समितीत संबंधित उपविभागीय कृषी अधिकारी अध्यक्ष, तालुका कृषी अधिकारी, कृषी विद्यापीठ किंवा कृषी संशोधन केंद्र किंवा कृषी विज्ञान केंद्राचे प्रतिनिधी, महाबीज प्रतिनिधी हे सदस्य, तर पंचायत समितीचे कृषी अधिकारी हे सचिव आहेत.
पाईंटर
खरीप पिकाचे क्षेत्र : ७.८१ लाख हेक्टर
शेरतकरी संख्या : ४,१५,८१८
सरासरी जमीन धारणा : १.८८ लाख हेक्टर
कपाशीचे क्षेत्र : २,४४,००२ हेक्टर
सोयाबीनचे क्षेत्र : २,६९,६५९ हेक्टर
तुरीचे क्षेत्र : १,०६,१३४ हेक्टर