भुसावळ येथे रेल्वेचा 16 तासांचा मेगा ब्लॉक, अनेक रेल्वे गाड्या रद्द
By ऑनलाइन लोकमत | Published: April 19, 2019 07:05 PM2019-04-19T19:05:23+5:302019-04-19T19:06:20+5:30
भुसावळ रेल्वे स्थानकावर १९ एप्रिलला रुळांच्या कामासाठी १६ तासांचा मेगा ब्लॉक घेण्यात आला. त्यामुळे भुसावळ-नागपूर दरम्यान धावणाऱ्या बहुतांश रेल्वे गाड्या रद्द करण्यात आल्या होत्या.
अमरावती : भुसावळरेल्वे स्थानकावर १९ एप्रिलला रुळांच्या कामासाठी १६ तासांचा मेगा ब्लॉक घेण्यात आला. त्यामुळे भुसावळ-नागपूर दरम्यान धावणाऱ्या बहुतांश रेल्वे गाड्या रद्द करण्यात आल्या होत्या. या मार्गावर २१ एप्रिलपासून रेल्वे गाड्यांची वाहतूक सुरळीत होईल, असे कळविण्यात आले आहे.
मध्य रेल्वे विभागाने भुसावळ रेल्वे स्थानकावरील महत्त्वाची कामे आटोपण्यासाठी ५ ते २० एप्रिल दरम्यान पॅसेंजर रेल्वेसह काही एक्स्प्रेस, मेल रद्द करण्याचा निर्णय अंमलात आणला. भुसावळ रेल्वे स्थानकावरील यार्डचे नूतनीकरण, नवीन प्लॅटफार्म आणि तिसरा लोहमार्ग निर्मितीचे कार्य युद्धस्तरावर होत असल्याने दरदिवशी आठ तासांचा मेगा ब्लॉक घेतला जात होता. मेगा ब्लॉकमुळे ७८ रेल्वे गाड्यांच्या फेºया रद्द झाल्या. या अनुषंगाने शुक्रवारी भुसावळ येथे १६ तासांचा मेगा ब्लॉक घेऊन सर्वच कामे संपुष्टात आणली गेली. त्यामुळे २१ एप्रिलपासून रेल्वे गाड्या पूर्ववत सुरू होतील, असे संकेत मिळाले आहेत.
भुसावळ-नागपूर मार्गावर या रेल्वे गाड्या होत्या रद्द
अमरावती-सुरत एक्स्प्रेस , अमरावती-पुणे (वातानुकूलित) एक्स्प्रेस, भुसावळ-निजामुद्दीन गोंडवाना एक्स्प्रेस, हावडा-लोकमान्य टिळक एक्स्प्रेस, पुरी-अहमदाबाद एक्स्प्रेस, हावडा-अहमदाबाद एक्स्प्रेस, गोंदिया-कोल्हापूर महाराष्ट्र एक्सप्रेस या गाड्या रद्द होत्या. भुसावळ रेल्वे स्थानकाहून जाणाऱ्या हॉलिडे स्पेशल सहा फेऱ्या रद्द करण्यात आल्यात. भुसावळ-नागपूर, अमरावती-भुसावळ, नरखेड-भुसावळ, वर्धा-भुसावळ, मुंबई-भुसावळसह मुंबई-भुसावळ-नागपूर दरम्यान धावणाऱ्या जवळपास ३६ पॅसेंजर गाड्यांच्या फेऱ्या रद्द करण्यात आल्या होत्या.