सुविधांसाठी १६ तासांची पायपीट
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: September 13, 2017 10:50 PM2017-09-13T22:50:50+5:302017-09-13T22:51:25+5:30
चिखलदरा येथील आदिवासी वसतिगृहात आवश्यक सोयी-सुविधा पुरविण्याच्या मागण्यांसाठी मंगळवार सकाळी पदयात्रेला निघालेले ....
लोकमत न्यूज नेटवर्क
धारणी : चिखलदरा येथील आदिवासी वसतिगृहात आवश्यक सोयी-सुविधा पुरविण्याच्या मागण्यांसाठी मंगळवार सकाळी पदयात्रेला निघालेले ६४ विद्यार्थी १६ तास व ७० किलोमीटरचा पायीप्रवास करीत बुधवारी सकाळी ११ वाजता धारणी प्रकल्प कार्यालयावर धडकले.
येथे पोहोचून त्यांनी समस्यांचा पाढाच वाचला. पंधरा दिवसांत त्यांच्या समस्यांचे निराकरण करण्याचे आश्वासन प्रकल्प अधिकारी विजय राठोड यांनी दिले. अन्य मार्गाने समस्या सोडविता आल्या असता, असा सल्ला प्रकल्प अधिकारी राठोड यांनी या विद्यार्थ्यांना दिला. विद्यार्थ्यांच्या तक्रारीनुसार, मागील तीन वर्षांपासून पालिकेच्या टाऊन हॉलमध्ये वसतिगृहाची व्यवस्था करण्यात आली होती. ही इमारत जीर्ण झाली आहे. कोणत्याही सुविधा नाहीत. याची माहिती वार्डनसह प्रकल्प अधिकाºयांना दिल्याचे विद्यार्थ्यांनी सांगितले. यावेळी उपविभागीय पोलीस अधिकारी नेहुल उपस्थित होते.
पायांना झाल्या जखमा
सत्तर किलोमीटरचा प्रवास केल्यामुळे अनेक विद्यार्थ्यांच्या पायांना जखमा झाल्या होत्या. विद्यार्थी धारणी कार्यालयात पोहोचल्यावर एका ठिकाणी बसून जागेवरच झोपी गेले. यातील एक विद्यार्थी प्रवासादरम्यान बेशुद्ध झाला. यामुळे त्याला तत्काळ रुग्णालयात दाखल करण्यात आले. विद्यार्थ्यांच्या प्रवासावर पोलीस लक्ष ठेऊन होते. विद्यार्थ्यांचे हे आंदोलन अनोखे ठरले.
विद्यार्थी पायी चलत आले, याचे वाईट वाटले. आम्ही मंगळवारीच त्यांच्याशी चर्चा करण्याचा प्रयत्न केला. परंतु ते तयार नव्हते. त्यांच्या समस्या सोडवू. त्यांनी अभ्यासाकडे लक्ष द्यावे.
-विजय राठोड
प्रकल्प अधिकारी, धारणी