अमरावती विभागात १६ लाखांवर ज्येष्ठांचा अमृत प्रवास; ७५ वर्षावरील नागरिकांना मोफत सुविधा
By जितेंद्र दखने | Published: March 22, 2023 02:35 PM2023-03-22T14:35:52+5:302023-03-22T14:37:05+5:30
एसटी महामंडळ : प्रवाशांचा या योजनेला प्रतिसाद दिवसेंदिवस वाढत आहे
अमरावती : राज्य सरकारने महाराष्ट्र राज्य परिवहन महामंडळा मार्फत सुरू केलेल्या ७५ वर्षावरील अमृत ज्येष्ठ नागरिक योजनेत गत ऑगस्ट ते फेब्रुवारी २०२३ अशा सात महिन्यात अमरावती विभागातील सुमारे १६ लाख १२ हजार ८७५ ज्येष्ठांनी एसटी बसेस मध्ये अमृत प्रवास केलेला आहे. राज्य सरकारच्या मार्फत ७५ वर्षावरील प्रवाशांसाठी अमृत जेष्ठ नागरिक प्रवासी योजनेअंतर्गत मोफत प्रवासाची सुविधा उपलब्ध करून दिला आहे.
ऑगस्ट २०२२ मध्ये सुरू झालेल्या योजनेअंतर्गत प्रवाशांचा या योजनेला प्रतिसाद दिवसेंदिवस वाढत आहे. अमरावती विभागातील अमरावती, बडनेरा, चांदूर बाजार, दर्यापूर, परतवाडा, मोर्शी, वरूड, चांदूर रेल्वे अशा आठ आगारामधून सात महिन्यांच्या कालावधीत सुमारे १६ लाख १२ हजार ८७५ एवढया ज्येष्ठ नागरिकांनी मोफत प्रवासाचा लाभ घेतलेला आहे. या मोफत प्रवासाशी सेवेचा लाभ घेणाऱ्यांमध्ये विभागातील चांदूर बाजार आगार अव्वल आहे. गत सात महिन्यात २ लाख ३४ हजार प्रवाशांनी या आगारातील बसव्दारे प्रवास केला तर बडनेरा आगारामध्ये सर्वात कमी १ लाख २२ हजार ज्येष्ठांनी अमृत प्रवासाचा आनंद घेतला आहे.
सात महिन्यातील प्रवाशी संख्या
महिना - प्रवाशी संख्या
ऑगस्ट-९९५२
सप्टेंबर-१६४५१३
ऑक्टोंबर-२१८१२२
नोव्हेंबर-२६१७९३
डिसेंबर-२९४३६४
जानेवारी-३१९९९६
फेब्रुवारी-३४४१३५
एक़ूण -१६१२८७५
७५ वर्षावरील नागरिकांसाठी अमृत ज्येष्ठ नागरिक प्रवास ही योजना मोफत महामंडळा मार्फत राबविली जात आहे. गत सात महिन्यात सुरूवातील अपवाद सोडला तर सप्टेंबर महिन्यापासून या योजनेला प्रवाशाचा चांगला प्रतिसाद आहे. विभागात १६ लाखांवर प्रवाशांनी अमृत योजनेतून प्रवास केलेला आहे.
- निलेश बेलसरे, विभाग नियंत्रक अमरावती